पुरेशा पाणीपुरवठ्याचे आश्वासन हवेत विरणार ?
By Admin | Updated: April 26, 2015 22:33 IST2015-04-26T22:33:05+5:302015-04-26T22:33:05+5:30
शहरातील पाणी टंचाईवर मात करण्यासाठी जलकुंभाद्बारे पाणी पुरवठा होणार असून त्याचे वेळापत्रक विभागाने बनविले आहे.

पुरेशा पाणीपुरवठ्याचे आश्वासन हवेत विरणार ?
उल्हासनगर : शहरातील पाणी टंचाईवर मात करण्यासाठी जलकुंभाद्बारे पाणी पुरवठा होणार असून त्याचे वेळापत्रक विभागाने बनविले आहे. मात्र जलकुंभ चाचण्या वादात सापडल्याने पाणी वितरण योजनेवर प्रश्नचिन्हे उभे ठाकले आहे.
उल्हासनगरातील पाणी वितरण व्यवस्था ५० वर्षापूर्वीची असल्याने जलवाहिनीला गळती लागून ४० टक्के गळती होत असल्याचा अहवाल पालिकेने दिला आहे. शहरातील पाणी टंचाई व गळती दूर करण्यासाठी २८७ कोटीची पाणी पुरवठा योजना गेल्या ६ वर्षापूर्वी सुरू केली आहे. योजने अंतर्गत संपूर्ण शहरात जलवाहिन्या नव्याने टाकण्यात येत असून १२ उंच तर १ भूमिगत जलकुंभ उभारण्यात आले आहे. तसेच पंपिग स्टेशन बांधण्यात आले आहे.
विभागाचे कार्यकारी अभियंता कलई सेलवन, शहर अभियंता रमेश शिर्के यांनी पाणी पुरवठा वेळापत्रक तयार केले आहे. तसेच १२ जलकुंभाच्या चाचण्या घेतल्या आहेत. त्यातील दोन ते तीन जलकुंभांना गळती लागल्याचा आरोप नगरसेवकांनी केला आहे. तर जलकुंभातून पाणी ओव्हर फलो झाल्याचा खुलासा विभागाच्या अधिकांऱ्यानी केला आहे. तज्ज्ञांनी योजनेवर संशय व्यक्त केल्याने योजना वादात सापडली आहे.
योजनेतील १२ जलकुंभासह अर्ध्याअधिक जलवाहिन्याच्या चाचण्या घेतल्याची प्रतिक्रीया शहर अभियंता रमेश शिर्के यांनी दिली आहे. ज्या ठिकाणी चाचण्या अयशस्वी झाल्या आहेत. त्यातील तांत्रिक अडथळा दूर करावा लागणार असल्याची माहिती शिर्के यांनी दिली आहे. जलकुंभाची चाचण्या यशस्वी झाल्यास जलकुंभातूनच समांतर पाणी पुरवठा केला जाणार असून सद्य-स्थितीत शहराला असमतोल पाणी पुरवठा होत असल्याने विविध भागात पाणी टंचाई निर्माण झाली आहे. (प्रतिनिधी)