Join us

अशा बातम्या पूर्वी फक्त बिहार, युपीमधून यायच्या; वडेट्टीवारांचा राज्य सरकारवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2024 23:12 IST

एका मागून एक गोळीबाराच्या घटना राज्यात घडत आहेत, इतके सगळे होत असताना मुख्यमंत्री आणि गृहमंत्री ठिकाणावर आहेत का? असा सवाल विचारला आहे.

ठाकरे गटाचे नेते अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येवरून विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर टीका केली आहे. फेसबुक लाईव्हवर एका लोकप्रतिनिधीवर गोळीबार होतो यापेक्षा राज्याचे दुसरे काय दुर्दैव असू शकते? असा सवाल केला आहे. एक नागरिक म्हणून प्रचंड चीड आणणारी ही घटना असल्याचे वडेट्टीवार म्हणाले आहेत. 

एका मागून एक गोळीबाराच्या घटना राज्यात घडत आहेत, इतके सगळे होत असताना मुख्यमंत्री आणि गृहमंत्री ठिकाणावर आहेत का? नुसती कारवाई करतो, चौकशी करतो हे तुमचे शब्द किती पोकळ आहेत, बघताय का? लोकप्रतिनिधी सुरक्षित नाही, नेत्यांवर गोळीबार होतोय, सत्ताधारी आमदार बंदुका घेऊन दहशत माजवत आहेत. अश्या बातम्या पूर्वी फक्त बिहार आणि उत्तरप्रदेश मधून यायच्या. आज हे चित्र महाराष्ट्रातील जनता प्रत्यक्ष आपल्या राज्यात बघत आहे, अशी टीका वडेट्टीवार यांनी केली आहे.

राज्यात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री गुंडांना राजाश्रय देत आहेत, एकमेकांवर कुरघोडी करण्यात व्यस्त आहेत. राज्यात काय सुरू आहे याची जाणीव तरी सत्ताधाऱ्यांना आहे का? असा सवाल वडेट्टीवार यांनी केला आहे. 

टॅग्स :विजय वडेट्टीवारशिवसेनागोळीबारअभिषेक घोसाळकर