भारतातही अशा निर्णयाचा विचार व्हावा
By Admin | Updated: June 29, 2015 05:49 IST2015-06-29T05:49:51+5:302015-06-29T05:49:51+5:30
अमेरिकेमध्ये समलिंगींना विवाह करण्यास परवानगी मिळाल्याचे पडसाद जगभरात उमटताना दिसले. भारतातही एलजीबीटी संघटना हक्कांसाठी गेली काही वर्षे लढत आहे.

भारतातही अशा निर्णयाचा विचार व्हावा
मुंबई : अमेरिकेमध्ये समलिंगींना विवाह करण्यास परवानगी मिळाल्याचे पडसाद जगभरात उमटताना दिसले. भारतातही एलजीबीटी संघटना हक्कांसाठी गेली काही वर्षे लढत आहे. अमेरिकेने घेतलेला निर्णय स्वागतार्ह असल्याचे त्यांचे मत आहे. तर काहींनी त्यावर संपूर्ण विचार होण्याची आवश्यकता असल्याचे मत व्यक्त केले आहे.
समलैंगिक संबंधांना अमेरिकेत मान्यता दिल्याने देशभरातील ‘एलजीबीटी’ समुदायाने या निर्णयाचे स्वागत केले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून एलजीबीटी समुदायाच्या हक्क आणि अधिकारांविषयी आम्ही लढा देत आहोत. मात्र आता अमेरिकेतील या निर्णयामुळे आमच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी ‘गे’ समुदायातील हरीश अय्यर यांच्या संदर्भातील पहिली मेट्रीमोनिअल जाहिरात प्रसिद्ध झाली होती. त्यामुळे भविष्यात एलजीबीटी समुदायाबाबत सकारात्मकता वाढीस लागली असून, समाजातील सर्व स्तरांवर जनजागृतीचे प्रयत्न सुरू असल्याचे ‘हमसफर’ संस्थेचे कार्यकर्ते पल्लव पाटणकर यांनी सांगितले.
अमेरिकने समलिंगी संबंधांना दिलेली मान्यता हा ऐतिहासिक निर्णय आहे. याप्रमाणे इतर देशांनीही या कायद्यातील बारकावे समजून आणि त्यांचा अभ्यास करून एलजीबीटी समुदायाला न्याय दिला पाहिजे. गेल्या अनेक वर्षांपासून या समुदायासाठी लढणाऱ्या संस्था आणि व्यक्तींनी निर्णयाचे स्वागत केले असून, त्या लढ्याचे हे फलितच आहे. त्यामुळे आता एलजीबीटी समुदायानेही पुढाकार घेऊन आपल्या जाणिवा समाजासमोर मांडल्या पाहिजेत; जेणेकरून समाजातील सर्व स्तरांवर या समुदायाविषयीचे गैरसमज दूर होण्यास मदत होईल, असे मत समपथिक ट्रस्टचे संस्थापक बिंदूमाधव खिरे यांनी मांडले. समलिंगींना अमेरिकेत विवाह करण्याची परवानगी देण्यात आली आहे. भारतातील परिस्थिती, मानसिकता वेगळी आहे. यामुळे आपल्या येथे हा निर्णय लागू होण्यास अनेक अडथळे आहेत. सध्या लिव्ह इन रिलेशनशिपचा जमाना आहे. आपल्या येथेही अनेक समलिंगी एकत्र राहत आहेत. आता लग्न करायला द्या, असे म्हणणे म्हणजे आपण पुन्हा मागे जात आहोत, असे मत तृतीयपंथी गौरी यांनी व्यक्त केले.
पुढे गौरी यांनी सांगितले, की समलिंगी व्यक्तींनी कोणतीही गोष्ट करताना समाजाला कोणतेही नुकसान होणार नाही, याची खबरदारी बाळगली पाहिजे. एचआयव्ही एड्सचे प्रमाण समलिंगींमध्ये जास्त आहे. अनेक लेस्बीयन एकत्र राहत आहेत. पण गे एकाच बरोबर लग्न करून राहू शकतील का, हादेखील एक प्रश्न आहे. लग्न म्हटले की दोन व्यक्तींच्या बरोबरच दोन घरेदेखील जोडली जातात. लग्नाला परवानगी दिली म्हणजे प्रश्न सुटत नाही. मग त्यांना कोणते हक्क मिळणार, प्रॉपर्टीमध्ये हक्क मिळणार का नाही, घटस्फोट या सगळ््याच गोष्टींचा विचार केला पाहिजे. (प्रतिनिधी)
समलैंगिक संबंधांना अमेरिकेत मान्यता दिल्याने देशभरातील ‘एलजीबीटी’ समुदायाने या निर्णयाचे स्वागत केले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून एलजीबीटी समुदायाच्या हक्क आणि अधिकारांविषयी आम्ही लढा देत आहोत. मात्र आता अमेरिकेतील या निर्णयामुळे आशा पल्लवित झाल्या. -पल्लव पाटणकर, हमसफर ट्रस्ट, मुंबई
आता एलजीबीटी समुदायानेही पुढाकार घेऊन आपल्या जाणिवा समाजासमोर मांडल्या पाहिजेत; जेणेकरून समाजातील सर्व स्तरांवर या समुदायाविषयीचे गैरसमज दूर होण्यास मदत होईल - बिंंदूमाधव खिरे, समपथिक ट्रस्ट, पुणे