Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘ब्लू बेबी’ समर्थवर यशस्वी शस्त्रक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2019 00:40 IST

शिर्डीत रोजंदारीवर काम करणाऱ्या मजुराच्या पाच महिन्यांच्या समर्थ घाडे या बाळाचा जीव वाचविण्यात मुंबईतील डॉक्टरांना नुकतेच यश आले आहे.

मुंबई : शिर्डीत रोजंदारीवर काम करणाऱ्या मजुराच्या पाच महिन्यांच्या समर्थ घाडे या बाळाचा जीव वाचविण्यात मुंबईतील डॉक्टरांना नुकतेच यश आले आहे. जन्मापासून हे बाळ हृदयविकाराने त्रस्त होते. हृदयाच्या चुकीच्या कप्प्यातून रक्ताचा प्रवाह होत होता, त्याचप्रमाणे रक्त वाहून नेणाºया नसादेखील आकुंचित असल्याचे समोर आले होते. त्यामुळे या बालकाच्या प्रकृतीवर परिणाम होऊन त्याचे स्वास्थ्य अधिक ढासळत चालले होते. या बाळावर गिरगाव येथील खासगी रुग्णालयातील डॉक्टरांनी यशस्वी शस्त्रक्रिया केली असून आता त्याची प्रकृती सुधारते आहे अशी माहिती डॉक्टरांनी दिली.समर्थ रुग्णालयात दाखल झाला तेव्हा त्याच्या हृदयाच्या गुंतागुंतीच्या स्थितीमुळे त्याच्या रक्तातील आॅक्सिजनचा पुरवठा कमी झाल्यामुळे त्याची त्वचा निळी पडत होती. या शस्त्रक्रियेला साधारण आठ तास लागले. बालहृदयरोग तज्ज्ञांच्या चमूने अनोखे तंत्र वापरून हृदयाच्या डावीकडील कप्प्यातील दोन प्रवेश मोकळे केले. ड्युएल पाथवे रिपेअर तंत्रात बाळाच्या उतींचा वापर करण्यात आला, त्याचप्रमाणे त्या वाहिन्याही विस्तारण्यात डॉक्टरांना यश आले, अशी माहिती बालहृदयरोग विज्ञानतज्ज्ञ डॉ. शिवप्रकाश कृष्णनाईक यांनी सांगितले. केंद्रीय आरोग्य विभागाच्या ‘मिशन मुस्कान’ या प्रकल्पाच्या अंतर्गत ही शस्त्रक्रिया करण्यात आली. ही शस्त्रक्रिया गिरगाव येथील एच.एन. रिलायन्स फाउंडेशन रुग्णालयात पार पडली.>डॉ. अनुपमा नायर यांनी सांगितले की, या बालकात जन्मापासूनच हृदयविषयक गुंतागुंत होती. या आजाराला टोटल अनोमलोस पलनरी वेनोस कनेक्शन (टीएपीव्हीसी) असे म्हटले जाते. एकंदरित अशा प्रकारचा हृदयरोग केवळ एक टक्का मुलांमध्ये आढळतो. हृदयापर्यंत रक्त पोहोचविणाºया रक्तवाहिन्या अरुंद असल्याने व विचित्र पद्धतीने हृदयाशी जोडलेल्या असल्याने एकूणच रक्तपुरवठा व श्वसनात अडथळा होण्याची स्थिती असते.