मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील भुयारी मार्ग मंजूर
By Admin | Updated: March 26, 2015 01:31 IST2015-03-26T01:31:14+5:302015-03-26T01:31:14+5:30
मुंबई-अहमदाबाद मार्गावरील ढेकळे ते सातीवली येथील भुयारी मार्ग मंजूर करण्यात आला असून, लवकरच त्याचे काम पूर्ण करण्यात येईल,

मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील भुयारी मार्ग मंजूर
मुंबई : मुंबई-अहमदाबाद मार्गावरील ढेकळे ते सातीवली येथील भुयारी मार्ग मंजूर करण्यात आला असून, लवकरच त्याचे काम पूर्ण करण्यात येईल, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज विधानसभेत दिली. घोडबंदर ते तलासरी अच्छाडपर्यंतच्या रस्त्यांच्या दुरुस्तीबाबतचा प्रश्न सदस्य विलास तरे यांनी उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना पाटील म्हणाले, की या महामार्गावरील सहा नवीन भुयारी मार्गांचे काम नागरिकांच्या मागण्यांनुसार मंजूर करून पूर्ण करण्यात आले आहे. या महामार्गावर पोलिसांच्या माध्यमातून पेट्रोलिंग करण्यात येते. मात्र पोलिसांची संख्या कमी असल्याने या संदर्भात गृह विभागासोबत बैठक घेण्यात येईल तसेच या महामार्गावर असलेल्या अवैध धाब्यांवरही कारवाई करण्यात येईल. या महामार्गावरील अपघाताचे प्रमाण लक्षात घेता या ठिकाणी ट्रॉमा केअर सेंटरची आवश्यकता आहे. त्यासंदर्भात आरोग्य विभागासोबत याच अधिवेशनाच्या कालावधीत बैठक घेण्यात येईल, असेही पाटील यांनी सांगितले. (विशेष प्रतिनिधी)
तालुक्यात गरजेनुसार वसतिगृह
ज्या तालुक्यात जिथे गरज आहे तेथे सामाजिक न्याय विभागातर्फे वसतिगृह बांधण्यात येतील, असे आश्वासन सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी आज विधानसभेत दिले. मोताळा जि. बुलढाणा येथे मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह नसल्याबाबतचा प्रश्न सदस्य हर्षवर्धन सपकाळ यांनी उपस्थित केला होता. या संदर्भातील उपप्रश्नाला माहिती देताना सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे म्हणाले की, मोताळा तालुक्यात वसतिगृह बांधण्यासाठी शासकीय जमीन संपादित करण्याबाबत कार्यवाही सुरू आहे.
औरंगाबादच्या वसतिगृहात सुविधा द्या
औरंगाबाद येथील संत तुकाराम मुलांच्या शासकीय वसतिगृहात शासन निर्णयानुसार साहित्य पुरविण्याच्या आणि या ठिकाणचे कॅमेरे तातडीने सुरू करण्याचे निर्देश देण्यात आल्याची माहिती सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी आज विधानसभेत दिली.
औरंगाबाद येथील संत तुकाराम मुलांच्या शासकीय वसतिगृहात सोयी-सुविधा पुरविण्याबाबतचा प्रश्न सदस्य प्रशांत बंब यांनी उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना राज्यमंत्री कांबळे म्हणाले, मी वसतिगृहाला भेट दिली आहे.
बंद असलेले कॅमेरे तातडीने सुरू करावेत. वसतिगृहाच्या बाहेरील विद्यार्थ्यांना प्रवेश देऊ नये, अशा सूचना संबंधितांना देण्यात आल्या आहेत. संपूर्ण प्रकरणाची चौकशी महसूल विभागाच्या सक्षम अधिकाऱ्यामार्फत होईल, असे कांबळे यांनी सांगितले.
या ठिकाणी शैक्षणिक वर्षापासून वसतिगृह सुरू करण्यात येईल. ज्या ठिकाणी वसतिगृहांच्या बांधकामांसाठी शासकीय जमीन उपलब्ध होणार नाही, तेथे रेडीरेकनरप्रमाणे खाजगी जमीन खरेदी करण्यात येईल. तसेच ज्या वसतिगृहांमध्ये अंध, अपंग विद्यार्थी आहेत त्या ठिकाणी तातडीने रॅम्प बांधण्याचे आदेश संबंधित विभागाला देण्यात येतील. शासन निर्णयानुसार ज्या सोयी-सुविधा वसतिगृहासाठी आवश्यक आहेत त्या पूर्णपणे पुरविण्यात येतील, असेही कांबळे यांनी यावेळी सांगितले. या वेळी झालेल्या चर्चेत सदस्य सर्वश्री अजित पवार, बच्चू कडू यांनी भाग घेतला.
स्थानिकांना नोकऱ्यांत प्राधान्य
च्एखाद्या भागात उद्योग सुरू करताना औद्योगिक आस्थापनामध्ये स्थानिकांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी, यासाठी ८० टक्के नोकर भरतीचे प्रमाण राखले जाईल, याबाबत शासन स्तरावर संनियंत्रण सुरू असल्याची माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी आज विधानसभेत दिली़ नागपूर जिल्ह्यातील विविध औद्योगिक आस्थापनांमध्ये स्थानिक उमेदवारांची भरती झाली नसल्याबाबतचा प्रश्न सदस्य सुधाकर कोहळे यांनी उपस्थित केला होता.
च्त्याला उत्तर देताना देसाई म्हणाले, की औद्योगिक आस्थापनांमध्ये स्थानिक उमेदवारांना नोकरी देण्याचे बंधनकारक आहे. जिल्ह्यातल्या औद्योगिक आस्थापनांमध्ये स्थानिकांना नोकरी मिळते की नाही, याच्या अंमलबजावणीसाठी प्रत्येक जिल्ह्यात समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत.