Join us  

सीएसएमटी स्थानकापासून मेट्रोपर्यंत आता भुयारी मार्गाने पोहोचता येणार!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2023 9:53 AM

इतर पर्याय शोधण्याचा प्रयत्न; राज्य सरकार आणि रेल्वेत चर्चा.

मुंबई : सीएसएमटी रेल्वेस्थानक आणि सीएसएमटी मेट्रो स्थानकात भविष्यात होणारी गर्दी लक्षात घेता मेट्रो स्थानकाला जोडण्यासाठी एक नवीन भुयारी मार्ग (सबवे) बांधण्यात येणार आहे. याबाबत रेल्वे आणि राज्य सरकारमध्ये चर्चा सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

सबवेबाबत रेल्वे आणि राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांमध्ये एक बैठक झाली आहे, यामध्ये मेट्रो ते रेल्वेस्थानक जोडण्यासाठी एक पर्यायाचा शोध सुरू होता. त्यामध्ये  पहिल्या पर्यायामध्ये प्रस्तावित सीएसएमटी मेट्रो स्थानकाला सध्याचे सीएसएमटी रेल्वेस्थानक जोडण्यासाठी मुंबई महानगरपालिका भुयारी मार्गाचा वापर केला जात आहे. 

भविष्यातील गर्दी लक्षात घेता दुसऱ्या पर्यायाचा विचार केला जात आहे. यामध्ये दुसऱ्या पर्यायांतर्गत नवीन भुयारी मार्ग हा प्रस्तावित मेट्रो स्थानकाला सध्याच्या रेल्वेस्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक एकला हिमालयन पुलाजवळ जोडणारा असणार आहे. रेल्वे लँड डेव्हलपमेंट ॲथॉरिटीने हा प्रस्ताव मध्य रेल्वेला कळवला आहे.

सीएसएमटी रेल्वेस्थानकातून दररोज १६ लाख प्रवासी प्रवास करतात, तर २०२५ पर्यंत सीएसएमटीमेट्रोस्थानकातून २०२५ पर्यंत प्रवासी संख्या २ लाख असण्याचा अंदाज आहे. 

मुंबई मेट्रोद्वारे बांधण्यात येणाऱ्या या भुयारी मार्गामध्ये लिफ्ट, एस्केलेटर, ट्रॅव्हलेटर्स आणि टॉयलेट यासह इतर सुविधा असणार आहेत. मुंबई मेट्रो त्याची अभियांत्रिकी आणि तांत्रिक व्यवहार्यता ठरवेल, तर याचा खर्च राज्य सरकार आणि रेल्वे उचलणार आहे, असे मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या प्रवक्त्यांनी सांगितले.

या असतील सुविधा :लिफ्ट एस्केलेटर ट्रॅव्हलेटर रिफ्रेशमेंट शौचालय 

गर्दी कमी करण्यावर भर :

प्रस्तावित भुयारी मार्गामागील उद्देश केवळ मेट्रो आणि रेल्वेप्रणालींमध्ये गर्दीचा धोका कमी करणे, हा उद्देश आहे. विशेषत: आधीच गर्दी असलेल्या पालिका भुयारी मार्गात या पायाभूत सुविधा प्रकल्पाचे महत्त्व ओळखून रेल्वे लँड डेव्हलपमेंट ॲथॉरिटीने, राज्य सरकार आणि मध्य रेल्वे  एक व्यवहार्य तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

सबवेची गरज का?

सद्य:स्थितीत एक सबवे सीएसएमटी आहे, जो  आझाद मैदान आणि मुंबई  महापालिका मुख्यालय या ठिकाणी बाहेर पडतो. या भुयारी मार्गामध्ये नेहमी प्रवाशांची गर्दी असते; परंतु भविष्यात येथील गर्दी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे पर्याय आवश्यक आहे. 

टॅग्स :छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसमेट्रो