सलग दुसऱ्या दिवशीही उपनगरात वाहतूककोंडी
By Admin | Updated: August 12, 2014 01:07 IST2014-08-12T01:07:50+5:302014-08-12T01:07:50+5:30
सोमवारी पाऊस आणि खड्ड्यांमुळे वाहतूककोंडीचा सामना करावा लागलेला असतानाच सलग दुसऱ्या दिवशीही मुंबईकरांना वाहतूककोंडीला सामोरे जावे लागले

सलग दुसऱ्या दिवशीही उपनगरात वाहतूककोंडी
मुंबई : सोमवारी पाऊस आणि खड्ड्यांमुळे वाहतूककोंडीचा सामना करावा लागलेला असतानाच सलग दुसऱ्या दिवशीही मुंबईकरांना वाहतूककोंडीला सामोरे जावे लागले. मात्र खड्ड्यांबरोबरच काही ठिकाणी वाहनांचे अपघात झाल्याने वाहतूककोंडी झाल्याचे वाहतूक पोलिसांकडून सांगण्यात आले.
मंगळवारी सकाळी साडेआठ वाजल्यापासून मुंबई उपनगरात वाहतूककोंडीचे चित्र दिसू लागले. त्यामुळे कामानिमित्त बाहेर पडलेल्या मुंबईकरांना वाहतूककोंडीचा मोठा सामना करावा लागला. ईस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर विक्रोळीजवळ एक सिमेंट मिक्सर उलटला. वेगात असल्याने हा सिमेंट मिक्सर उलटल्याचे वाहतूक पोलिसांनी सांगितले. उलटताच ५०० मीटरपर्यंत हा मिक्सर गेला. त्यामुळे एक्स्प्रेस हायवेवर प्रचंड वाहतूककोंडी झाली. या घटनेची माहिती मिळताच तत्काळ वाहतूक पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी वाहतूककोंडी सोडवण्यासाठी
प्रयत्न सुरू केले. या मिक्सरला पुन्हा सरळ करण्यात तब्बल एक तास लागला.
ही घटना घडलेली असतानाच दिंडोशी पुलाजवळ असलेल्या खड्ड्यांमुळेही वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवरून जाणाऱ्या वाहनांचा खोळंबा उडाला. खड्ड्यांमुळे वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे पूर्णपणे जाम झाला आणि दक्षिण मुंबईकडे जाणाऱ्या प्रवासासाठी तासन्तास वाहन चालकांना मोजावे लागले. त्याचप्रमाणे गोरेगावच्या एमटीएनएलजवळ आणि एसएलआरवरही वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या. या रस्त्यांवरून जातानाही प्रवाशांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले. यामुळे सकाळी अकरा वाजेपर्यंत शहर आणि उपनगरात वाहतूककोंडीचेच चित्र होते. (प्रतिनिधी)