‘बीडीडी’चा पुनर्विकास आराखडा सादर करा
By Admin | Updated: February 4, 2015 02:40 IST2015-02-04T02:40:00+5:302015-02-04T02:40:00+5:30
येत्या १५ दिवसांत बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाचा आराखडा सादर करण्याचे आदेश गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी म्हाडाच्या अधिकाऱ्यांना दिले.

‘बीडीडी’चा पुनर्विकास आराखडा सादर करा
मुंबई : येत्या १५ दिवसांत बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाचा आराखडा सादर करण्याचे आदेश गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी म्हाडाच्या अधिकाऱ्यांना दिले. मुंबईतील तब्बल २०७ बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित असून, यावर तोडगा काढण्यासाठी राज्यमंत्र्यांनी आज सर्व संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांवी बैठक बोलावली.
वरळी, डिलाईल रोड, नायगाव व शिवडी येथील या चाळींच्या पुनर्विकासाचा मार्ग सुकर होण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी आठवडाभरात अहवाल सादर करावे, अशी सूचना वायकर यांनी बैठकीत केली. चाळीतील बऱ्याच इमारतींची दुरवस्था झाली असून तातडीने पुनर्विकास होणे आवश्यक आहे. मात्र रहिवाशांनी ५०० चौरस फूट घरांची केलेली मागणी, विकास खाजगी बिल्डरांकडून करायचे की सरकारी यंत्रणेतून यासारख्या वादांमुळे हा प्रश्न सुटू शकला नाही.
म्हाडाच्या काही नियमांत संशोधन केल्यास रहिवाशांची ५०० चौफुटाची मागणी पूर्ण करणे शक्य होणार असल्याचे वायकर यांनी सांगितले. म्हाडाच्या माध्यमातून विकास झाल्यास रहिवाशांच्या मागणीची पूर्तता करता येणार नाही. त्यामुळे ते काम खाजगी विकासकांनाच द्यावे, या दाव्यात तथ्य नसल्याचे सांगतानाच नवीन नियम व धोरणांच्या आधारे म्हाडालाही ५०० चौफुटाचे घर देणे शक्य होईल. शिवाय म्हाडाच्या माध्यमातून पुनर्विकास झाल्यास मुंबईत घरांचा स्टॉकही उपलब्ध करता येईल, असे त्यांनी या वेळी सांगितले. (प्रतिनिधी)