महापालिकेतून मिळणार विद्यार्थ्यांना बाल संरक्षणाचे धडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:33 IST2021-02-05T04:33:43+5:302021-02-05T04:33:43+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई विद्यार्थ्यांना चांगला स्पर्श म्हणजे काय , वाईट स्पर्श म्हणजे काय, याचे धडे ; शिवाय बाल ...

Students will get child protection lessons from NMC | महापालिकेतून मिळणार विद्यार्थ्यांना बाल संरक्षणाचे धडे

महापालिकेतून मिळणार विद्यार्थ्यांना बाल संरक्षणाचे धडे

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई

विद्यार्थ्यांना चांगला स्पर्श म्हणजे काय , वाईट स्पर्श म्हणजे काय, याचे धडे ; शिवाय बाल संरक्षण आणि त्यासंदर्भातील आवश्यक माहिती लवकरच विद्यार्थी, शिक्षकांना देण्याचे नियोजन पालिका शिक्षण विभाग करत आहे. महानगरपालिकेच्या सर्व शाळांमधून बालकांच्या संरक्षण हक्कासाठी रीडर्सल कमिटी नेमण्यासंदर्भात परिपत्रकाचा मसुदा प्रथम आणि टीच फॉर इंडिया या संस्थेच्या माध्यमातून महानगरपालिका तयार करत आहे. विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी या समित्यांना बालहक्क संरक्षण, तक्रारींचे निरसन तसेच तक्रार निवारण पद्धतीचे प्रशिक्षणही देण्यात येणार आहे.

अनेकदा शाळांमधून पॅाक्सो अंतर्गत विद्यार्थी पालकांच्या तक्रारी येत असतात. विद्यार्थ्यांना नियम, बालहक्क संरक्षण या कायद्याविषयी पूर्ण माहिती नसल्याने, मार्गदर्शन नसल्याने या तक्रारीचे निवारण होत नाही. यावर उपाय म्हणून महानगरपालिकेतर्फे हा उपक्रम हाती घेण्यात येणार आहे. या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना जागरुक करण्यासाठी भित्तीपत्रके, शाळांमध्ये प्रसारित करून, तसेच व्हाॅट्सॲपच्या माध्यमातून प्रसारित करून याबाबत माहिती देण्यात येणार आहे. याबाबतचा धोरणात्मक मसुदा तयार करण्याचे काम सद्यस्थितीत सुरू आहे. शिवाय विद्यार्थिनींच्या मुदत ठेव योजनेच्या बाबतीत २०२०-२१ मध्ये इयत्ता ८ वीच्या १३ हजार ५५० मुलींना ५ हजार रकमेची मुदत ठेव योजनेंतर्गत उपस्थिती प्रोत्साहन भत्ता भारतीय डाक विभाग यांच्याद्वारे प्रमाणपत्रे देण्याची कार्यवाही सुरू असून प्राथमिक, माध्यमिक मिळून ५ कोटी ३४ लाखांची तरतूद करण्यात आली आहे.

याशिवाय दिव्यंाग विद्यार्थ्यांसाठी विविध कल्याणकारी योजनांसाठी एकूण ३.१३ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. महानगरपालिका माध्यमिक शाळांत मार्च २०२० पासून परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या पहिल्या २५ विद्यार्थ्यांना व्यावसायिक प्रशिक्षणासाठी प्रतिवर्षी २५ हजार किंवा शैक्षणिक संस्थेने ठरवून दिलेले (ट्युशन शुल्क) देण्यात येणार आहे. यासोबतच पालिकेने सुरू केलेल्या पहिले अक्षर, भाषा प्रयोगशाळा अशा उपक्रमांना आणखी बळकटी देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. २४ विभागनिहाय संगीत अकादमी उभारण्याच्या कामासाठी १० लाखांची तरतूद पालिकेमार्फत करण्यात आली आहे. संगीततज्ज्ञ मयुरेश पै यांच्या मार्गदर्शनाखाली प्रायोगिक तत्त्वावर एनएम जोशी मार्ग महानगरपालिका शाळेमध्ये साउंडप्रूफ हॉल तयार करून मॉडेल संगीत केंद्र तयार करण्यात येणार आहे.

Web Title: Students will get child protection lessons from NMC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.