एनएसएसच्या विद्यार्थ्यांनी दिले धडे
By Admin | Updated: February 1, 2015 00:47 IST2015-02-01T00:47:21+5:302015-02-01T00:47:21+5:30
रस्ता सुरक्षा पंधरवडा अंतर्गत नुकताच कांदिवली वाहतूक विभाग आणि प्रकाश डिग्री कॉलेज - एनएसएस विभाग (राष्ट्रीय सेवा योजना) यांच्या संयुक्त विद्यमाने रस्ता सुरक्षा रॅली काढण्यात आली.

एनएसएसच्या विद्यार्थ्यांनी दिले धडे
मुंबई : रस्ता सुरक्षा पंधरवडा अंतर्गत नुकताच कांदिवली वाहतूक विभाग आणि प्रकाश डिग्री कॉलेज - एनएसएस विभाग (राष्ट्रीय सेवा योजना) यांच्या संयुक्त विद्यमाने रस्ता सुरक्षा रॅली काढण्यात आली. नागरिकांमध्ये वाहतुकीच्या नियमांची जनजागृती करण्याच्या उद्देशाने काढण्यात आलेल्या या रॅलीमध्ये एनएसएस प्रोग्राम आॅफिसर प्रा. संजय रावल यांच्या नेतृत्वाखाली एकूण ५० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
रोजच्या धावपळीच्या जीवनात प्रत्येक जण घाईमध्ये असतो. यातूनच बहुतेक वाहनचालकांकडून नियमांचे उल्लंघन होते आणि विनाकारण अपघात ओढावला जातो. नेमकी याच गोष्टीची जाणीव मुंबईकरांना करून देण्यासाठी वाहतूक विभाग आणि प्रकाश कॉलेजच्या एनएसएस विभागाने हा उपक्रम हाती घेतला होता.
कांदिवली पश्चिम येथील शंकर लेन येथून सुरुवात झालेली ही रॅली एस.व्ही. रोड मार्गे कांदिवली स्थानक - एम. जी. रोड येथे समाप्त झाली. यावेळी एनएसएस विद्यार्थ्यांनी तयार केलेले वाहतूक नियम पत्रकांचे नागरिक व वाहनचालकांमध्ये वाटप करण्यात आले. तसेच रॅली संपल्यानंतर विद्यार्थ्यांनी स्वत: पुढाकार घेऊन वाहनचालकांना वाहतुकीचे नियम पाळण्याचे आवाहनदेखील केले.
दरम्यान, यावेळी कांदिवली वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आर. डी. सोनावणे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी आपल्यावर दिलेली जबाबदारी पार पाडली. पोलिसांनी विद्यार्थ्यांसोबत संवाद साधून छोट्या-छोट्या चुकांमधून गंभीर अपघात कसे घडतात याची माहिती देत वाहतुकीचे नियम का पाळावे यावर मार्गदर्शन केले. (प्रतिनिधी)