लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : शासकीय मागासवर्गीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी प्रलंबित मागण्यांसाठी सोमवारपासून चेंबूर आणि पुण्यातील विश्रांतवाडी येथील वसतिगृहात भर पावसात बेमुदत आंदोलन सुरू केले आहे. वसतिगृहातील मिळणारे निकृष्ट भोजन, अस्वच्छता, निर्वाह भत्ता मिळण्यात होणारा विलंब यासह मुंबई आणि पुण्यात एक हजार विद्यार्थी क्षमतेची नवी वसतिगृह उभारली जावीत, ही मागणी घेऊन विद्यार्थ्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.
सामाजिक न्याय विभागाच्या वसतिगृहातील विविध प्रश्नांसाठी विद्यार्थ्यांनी गेल्या वर्षी १२ ते २८ फेब्रुवारीदरम्यान आंदोलन केले होते. त्या वेळी विद्यार्थ्यांच्या मागण्यांची पूर्तता करण्याचे लेखी आश्वासन सामाजिक न्याय विभागाने दिले होते. मात्र, जवळपास दीड वर्ष उलटले तरी या आश्वासनांची पूर्तता झाली नाही. अद्यापही विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर प्रशासनाने ठोस उपाययोजना केल्या नसल्याने आंदोलन सुरू केले आहे, अशी माहिती आंबेडकर स्टुडंट्स असोसिएशनचे उपाध्यक्ष रोहित कांबळे यांनी दिली.
सरकारच्या कोणत्याही प्रतिनिधीने आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांशी अद्याप संवाद साधला नाही. त्यामुळे मागण्या मान्य होईपर्यंत हे आंदोलन सुरू ठेवणार आहोत, असेही विद्यार्थ्यांनी नमूद केले.