Join us

४०० वर्षांपूर्वीचा दस्तऐवज पाहण्याची विद्यार्थ्यांना संधी; पुराभिलेख संचालनालयाकडून नवा उपक्रम

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2025 09:56 IST

१६३० सालापासूनचे ब्रिटिशकालीन, मोडी, ऊर्दू, इंग्रजी, देवनागरी, पर्शियन भाषेतील ऐतिहासिक कागदपत्रे या पुराभिलेखागारात आहे

मुंबई : राज्य सरकारच्या पुराभिलेख संचालनालयामधील ४०० वर्षांपासूनची ऐतिहासिक कागदपत्रे जतन करण्यात आली आहेत. मानव जातीचा  इतिहास समजण्यासाठी या ठेव्याचा उपयोग  शाळा व महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी करावा, त्याकरिता पुराभिलेख संचालनालयाकडून नवा उपक्रम राबविण्यात येणार आहे. त्यात विद्यार्थ्यांना पुराभिलेखागाराला  भेटी देता येणार आहेत.

१६३० सालापासूनचे ब्रिटिशकालीन, मोडी, ऊर्दू, इंग्रजी, देवनागरी, पर्शियन भाषेतील ऐतिहासिक कागदपत्रे या पुराभिलेखागारात  आहे. पुराभिलेखागाराच्या मुंबई कार्यालयात साडेदहा कोटी, तर राज्यातील विविध कार्यालयांत मिळून एकूण १७ कोटी ५० लाख कागदपत्रे  उपलब्ध आहेत. हा ऐतिहासिक ठेवा विद्यार्थ्यांनी जवळून पाहावा, त्यांच्या मनात इतिहासाबाबत जागृती निर्माण व्हावी, या उद्देशाने विद्यार्थ्यांसाठी खास भेटीचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. असे आवाहन करण्यात आले आहे.

देशी-विदेशी संशोधक येथे भेट देतात. इतिहास समजण्यासाठी  देशातील प्रेक्षणीय स्थळांसोबत पुराभिलेखागाराला भेट देणे, आवश्यक आहे. आपल्या इतिहासाला महान परंपरा आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना इतिहासाची साधने कशी जतन केली जातात हे शिकायला मिळेल. - सुजितकुमार उगले, संचालक, पुराभिलेखागार

रेल्वे स्थानकांचे नकाशे, जमिनींच्या नोंदी मुंबईच्या फोर्ट विभागातील एलफिस्टन महाविद्यालयाच्या इमारतीत मागील बाजूस पुराभिलेखागार  संचालनालयाचे मुख्यालय आहे तेथील मुंबईतील रेल्वे स्थानकांचे २० फूट लांब, असे सुंदर नकाशे पाहण्याजोगे आहेत. इनामी जमिनी, देवस्थाने जमिनी याच्या मूळ नोंदीदेखील या पुराभिलेखागारात पाहायला मिळतात.  विद्यार्थ्यांना भेट देण्यापूर्वी आठ दिवस आधी नोंदणी करावी लागणार आहे.