भीषण अपघातातून विद्यार्थी बचावले
By Admin | Updated: August 26, 2015 02:02 IST2015-08-26T02:02:56+5:302015-08-26T02:02:56+5:30
मुलुंड-गोरेगाव जोडरस्त्यावर खिंडीपाडा परिसरात सोमवारी संध्याकाळी सहाच्या सुमारास स्कूल बस आणि इको कार यांच्यात भीषण अपघात झाला. अपघात घडला तेव्हा

भीषण अपघातातून विद्यार्थी बचावले
मुंबई : मुलुंड-गोरेगाव जोडरस्त्यावर खिंडीपाडा परिसरात सोमवारी संध्याकाळी सहाच्या सुमारास स्कूल बस आणि इको कार यांच्यात भीषण अपघात झाला. अपघात घडला तेव्हा बसमध्ये मुलुंडच्या वझे इंग्लिश स्कूलमध्ये शिकणारे २१ विद्यार्थी होते. त्यापैकी एक विद्यार्थी व इको कारचालक जखमी झाले. अपघात
इतका भीषण होता की, खिंडीपाड्याचा चढाव चढणारी स्कूलबस धडकेनंतर सुमारे २० फूट मागे फेकली गेली.
मुलुंड पोलिसांनुसार इको कारचालकाचे नाव रवींद्र पुरुषोत्तम सावंत (५८) असून, ते या अपघातात गंभीररीत्या जखमी झाले आहेत. त्यांच्याविरोधात निष्काळजीपणे वाहन चालवून अपघातास कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
अपघातग्रस्त इको सावंत यांची आहे. ते भांडुपला राहतात. काल ते कामानिमित्त खिंडीपाडा येथे आले होते. तेथून परतत असताना खिंडीपाड्याच्या उतारावर इकोचा ब्रेक फेल झाला. त्यामुळे इकोवरील सावंत यांचे नियंत्रण सुटले. इतक्यात खालून वझे शाळेची बस वर येत होती. सावंत यांची इको या स्कूलबसला अत्यंत वेगात समोरून आदळली. ही धडक इतकी भीषण होती की इकोचा चेंदामेंदा झालाच आणि स्कूलबसही सुमारे २० फूट मागे फेकली गेली.
जखमींवर उपचार
स्कूलबसमध्ये पहिले ते पाचवी इयत्तेचे २१ विद्यार्थी होते. मात्र एवढ्या भीषण अपघातातूनही हे विद्यार्थी सुखरूप बचावले. एका विद्यार्थ्याला किरकोळ मार लागला, असे पोलिसांनी सांगितले. सावंत व विद्यार्थ्यांवर मुलुंडच्या अग्रवाल रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.