Join us
Daily Top 2Weekly Top 5

चेंगराचेंगरीतील ‘त्या’ विद्यार्थ्याची प्रकृती स्थिर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2018 06:04 IST

मुलुंड पश्चिमेकडील लाल बहादूर शास्त्री मार्गावर असलेल्या रुणवाल स्क्वेअर इमारतीच्या चौथ्या मजल्यावर महाराष्ट्र राज्य औषध व्यवसाय परिषदेचे कार्यालय आहे.

मुंबई : मुलुंड पश्चिमेकडील लाल बहादूर शास्त्री मार्गावर असलेल्या रुणवाल स्क्वेअर इमारतीच्या चौथ्या मजल्यावर महाराष्ट्र राज्य औषध व्यवसाय परिषदेचे कार्यालय आहे. डी. फार्म आणि बी. फार्मची पदवी किंवा डिप्लोमा केलेल्या विद्यार्थ्यांची या कार्यालयात आॅनलाइन आणि आॅफलाइन नोंदणी केली जाते. या नोंदणीसाठी अर्ज करण्याची मुदत फक्त ७ आॅगस्टपर्यंतच आहे, या अफवेने शुक्रवारी येथे चेंगराचेंगरी झाली आणि त्यामध्ये आदित्य शिंगाळे (२०) हा तरुण गंभीर जखमी झाला. आदित्यवर मुलुंडमधील फोर्टिस रुग्णालयात तातडीने उपचार करण्यात आले असून त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती फोर्टिस रुग्णालयाकडून देण्यात आली आहे.चेंगराचेंगरीत आदित्य शिंगाळेच्या अंगावर इमारतीचे लोखंडी प्रवेशद्वार कोसळले. त्यामुळे त्याच्या छातीला गंभीर मार लागला आणि त्याचा कानही तुटला. नोंदणीसाठी नागपूरमधील श्री. के.आर. पांडव कॉलेज आॅफ फार्मसीचा आदित्य मित्रासह मुंबईत आला होता. मात्र नोंदणीसाठीची गर्दी, त्यातच पावसामुळे विद्यार्थ्यांचा उडालेला गोंधळ आणि त्यामुळे झालेली चेंगराचेंगरी यात तो गंभीर जखमी झाला. उपचारादरम्यान आदित्यचा कान पूर्णपणे तुटल्याचे व त्याच्या फुप्फुसाला गंभीर मार लागल्याचे निदान झाले. तुटलेला कान सापडल्याने तब्बल तीन तास शस्त्रक्रिया करून त्याचे प्रत्यारोपण करण्यात आले. आता त्याची प्रकृती स्थिर असल्याचे समजते.दरम्यान ७ तारखेपासून नोंदणी बंद होणार असून आॅनलाइन नोंदणीसाठी सीईटी परीक्षा होणार आहे. ही प्रक्रिया खूप मोठी आहे अशा प्रकारच्या अफवा विद्यार्थ्यांमध्ये पसरविल्या जात आहेत. त्यामुळे कार्यालयात गर्दी होऊन चेंगराचेंगरी झाली.विद्यार्थ्यांनी अशा कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता आॅनलाइन सुविधेचा लाभ घ्यावा आणि कार्यालयात गर्दी करू नये, असे आवाहन महाराष्ट्र राज्य औषध व्यवसाय परिषदेकडून करण्यात आले आहे.

टॅग्स :हॉस्पिटल