लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबई विद्यापीठाशी संलग्नित कॉलेजांमध्ये व्यवस्थापन कोटा आणि विद्यापीठाने परवानगी दिलेल्या अतिरिक्त जागांवर प्रवेशासाठी कॉलेजेस विद्यार्थ्यांकडून मोठी रक्कम आकारून विद्यार्थ्यांची लूट करीत आहेत, असा आरोप युवा सेनेने केला आहे. तसेच या कॉलेजांवर जबर बसविण्यासाठी देखरेख समिती नियुक्त करावी, अशी मागणीही केली आहे.
मुंबईतील नामांकित कॉलेजांमध्ये व्यवस्थापन आणि वाणिज्य शाखेच्या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांमध्ये मोठी चुरस पाहायला मिळते. या कॉलेजांमध्ये प्रवेशासाठी पालकांची मागणी पाहून कॉलेजेसही व्यवस्थापन कोट्यातून गैरमार्गाने पैसे घेऊन विद्यार्थ्यांना प्रवेश देतात. अनेक कॉलेजेसमध्ये गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना डावलून प्रवेश दिले जात असल्याच्या तक्रारी पालकांनी केल्या आहेत, अशी माहिती युवा सेनेचे नेते आणि सिनेट सदस्य प्रदीप सावंत यांनी दिली. विद्यापीठामध्ये सध्या या प्रवेशांवर देखरेख ठेवण्यासाठी अतिरिक्त देखरेख समितीच नसल्याने कॉलेजांच्या मनमानी कारभाराला खतपाणी मिळत असल्याचा आरोपही त्यांनी केला. त्यामुळे या गैरमार्गाने होणाऱ्या प्रवेशांना पायबंद घालण्यासाठी विद्यापीठाने तत्काळ देखरेख समिती नेमावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
त्याबाबतचे पत्र विद्यापीठाचे प्र-कुलगुरू प्रा. अजय भामरे यांना युवा सेनेने दिले आहे. यावेळी सिनेट सदस्य शीतल शेठ देवरुखकर यांच्यासह युवा सेनेचे राजन कोळंबकर उपस्थित होते.