Join us  

विद्यार्थी करणार अन्नत्याग, निकाल राखून ठेवल्याचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2018 5:56 AM

मुंबई विद्यापीठ आणि निकालाचा तिढा यामुळे अनेक विद्यार्थी हतबल झालेले आहेत.

मुंबई : मुंबई विद्यापीठ आणि निकालाचा तिढा यामुळे अनेक विद्यार्थी हतबल झालेले आहेत. याचेच आणखी एक उदाहरण म्हणजे अभिषेक सावंत. या विद्यार्थ्याने निकाल गोंधळामुळे या आधी आत्मदहनाचा इशारा दिला होता. मात्र, त्यामुळेच विद्यापीठाने मुद्दाम निकाल राखून ठेवल्याचा आरोप करत, त्याने आता १९ जुलै रोजी विद्यापीठाच्या कलिना कॅम्पसमध्ये अन्नत्याग करण्याचा इशारा दिला आहे. निकालासाठी त्याने राज्यपालांच्या नावे पत्र लिहिले आहे.मुंबई विद्यापीठातील लॉ शाखेचा विद्यार्थी असलेला अभिषेक सावंत याने नोव्हेंबर २०१७ रोजी लॉ अभ्यासक्रमाची ५ आणि ६व्या सत्राची परीक्षा दिली होती. परीक्षेत नापास झाल्याने त्याने पूनर्मूल्यांकनासाठी अर्ज केला होता. त्यात तो उत्तीर्ण झाला आहे. मात्र, त्यानंतरही अभिषेकला त्याची गुणपत्रिका देण्यात आलेली नाही. अभिषेक सेमिस्टर चारच्या परीक्षेत नापास झाल्याने, त्याला गुणपत्रिका देण्यात आली नसल्याचे कारण त्याला विद्यापीठाकडून देण्यात आले आहे. प्रत्यक्षात अभिषेकने सेमिस्टर चारची परीक्षा उत्तीर्ण केली आहे. त्याचा निकालदेखील त्याने विद्यापीठाकडे सुपुर्द केला आहे. मात्र, त्यानंतरही त्याला सेमिस्टर पाच आणि सहाचा सुधारित निकाल मिळाला नसल्याचे अभिषकचे म्हणणे आहे. यासंदर्भात मुंबई विद्यापीठाचे उपकुलसचिव दिनेश कांबळे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.>आश्वासनावरच बोळवणगेल्या अनेक दिवसांपासून निकालासाठी विद्यापीठात वणवण फिरत आहे. दहा दिवसांत निकाल मिळेल, वीस दिवसांत निकाल मिळेल, अशी आश्वासने देण्यात येतात, पण निकाल काही मिळत नाही. त्यामुळेच आता १९ जुलै रोजी मी विद्यापीठाच्या कलिना कॅम्पस येथील परीक्षा भवनाच्या समोरच अन्नत्याग करण्याचा निर्णय घेतला आहे.- अभिषेक सावंत, लॉ विभागाचा विद्यार्थी.

टॅग्स :आंदोलन