Join us

विद्यार्थ्यांची तस्करी रोखली? मुंबई विमानतळावर प्राध्यापकाला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2025 12:22 IST

व्हिसा मिळविण्यासाठी खोटी माहिती सादर केल्याचा आरोप

मुंबई : पंजाब आणि हरियाणाच्या सात तरुणांना विद्यार्थी विनिमय कार्यक्रमासाठी ब्रिटनला घेऊन जाणाऱ्या हरियाणातील एका खासगी विद्यापीठाच्या प्राध्यापकाला सोमवारी मुंबईविमानतळावर अटक करण्यात आली. त्याच्यावर व्हिसा मिळविण्यासाठी खोटी माहिती सादर केल्याचा आरोप आहे. मात्र, प्रथमदर्शनी हा मानवी तस्करीचा प्रकार असल्याचा संशय पोलिसांना आहे. 

या प्रकरणात सुरुवातीला पोलिसांनी तीन अल्पवयीन मुलांसह सात तरुणांना ताब्यात घेतले होते. परंतु, नंतर न्यायालयाच्या आदेशानुसार त्यांची सुटका करण्यात आली. आरोपी प्राध्यापक हरियाणा येथील विद्यापीठाशी संबंधित आहे की नाही याची पडताळणी पोलिस करत आहेत. या प्राध्यापकाने दिलेल्या ओळखपत्राची सत्यता पोलिस तपासत आहेत. सहार पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करून हे प्रकरण चौकशीसाठी प्रॉपर्टी सेलकडे वर्ग केले आहे. 

नेमकी घटना काय?

सोमवारी मध्यरात्री १२.३०च्या सुमारास दोन तरुणांनी मुंबई विमानतळावरील इमिग्रेशन काउंटरवर पडताळणीसाठी त्यांचे पासपोर्ट आणि व्हिसा सादर केले. त्यांच्याकडे इंग्लंडचा व्हिजिट व्हिसा होता. 

काउंटरवरील अधिकाऱ्याला त्यांनी आपण हरियाणास्थित विद्यापीठाचे विद्यार्थी असल्याचे आणि विद्यार्थी विनिमय कार्यक्रमासाठी प्राध्यापकांसह लंडनला जात असल्याचे सांगितले. मात्र, अन्य प्रश्नांची त्यांना समाधानकारक उत्तर देता आली नाही. 

दिल्लीत घेतली बैठक

हरियाणा विद्यापीठातील दोन सहकाऱ्यांच्या सांगण्यावरून आपण काम करीत होतो, अशी कबुली प्राध्यापकाने दिली आहे.

यापूर्वी त्याने दिल्लीतील एका हॉटेलमध्ये बिट्टू नावाचा एजंट आणि यूकेमध्ये स्थायिक होऊ इच्छिणाऱ्या सात तरुणांबरोबर बैठक घेतली होती. त्यासाठी बिट्टूने प्रत्येकी २० लाख रुपये घेतले होते. प्राध्यापक सात तरुणांना घेऊन लंडनला जाणार होता, असे पोलिसांनी सांगितले. 

टॅग्स :मुंबईविमानतळ