बालविज्ञान संमेलनात धातू, गणित, दुष्काळावर विद्यार्थ्यांचे सादरीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2019 00:20 IST2019-11-18T00:20:15+5:302019-11-18T00:20:17+5:30
पर्यावरण व समाजोपयोगी प्रकल्प हाताळले

बालविज्ञान संमेलनात धातू, गणित, दुष्काळावर विद्यार्थ्यांचे सादरीकरण
- ओमकार गावंड
मुंबई : मराठी विज्ञान परिषद आणि होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्र, मानखुर्द यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित नवव्या राज्यस्तरीय बालविज्ञान संमेलनाचा दुसरा दिवस अत्यंत लक्षवेधी ठरला. संमेलनाच्या पहिल्या दिवशी कचरा व्यवस्थापन, पाणी समस्या, सौरऊर्जा, आपत्ती व्यवस्थापन, प्रदूषण, शेतकरी समस्या या विषयांवर सादरीकरण झाले. अशाच प्रकारच्या पर्यावरण व समाजपयोगी सादरीकरणांद्वारे विद्यार्थ्यांनी आपली संवेदनशीलता दाखवून दिली. धातू, गणित, दुष्काळ, असे वेगवेगळे विषय विद्यार्थ्यांनी हाताळले. चार समांतर दालनात एकूण ५२ सादरीकरण झाले.
तन्वी लिधुरे व मयूरी लिधुरे या विद्यार्थीनींनी पारंपरिक ऊर्जा स्त्रोताला पर्यायी ऊर्जा स्रोत या विषयावर सादरीकरण केले. त्यांनी घराच्या छोट्या प्रतिकृतीचे एक वाळवणी यंत्र तयार केले होते. संपूर्ण यंत्र पारदर्शक प्लॅस्टिकच्या सहाय्याने तयार केले होते. त्यात वाळवलेल्या भाज्या देखील त्यांनी आणल्या होत्या. त्यांनी संगितले की या यंत्रात भाज्या वळवल्या जातात. विशेषत: पालेभाज्या वाळवण्यासाठी हे यंत्र अत्यंत उपयुक्त आहे. या यंत्रामध्ये भाज्या वाळवल्याने भाज्यांचा दर्जा टिकून राहतो. तसेच त्यांचे जीवनसातव देखील कमी होत नाहीत. आपण उघड्यावर भाज्या वाळत घातल्यास त्यावर धूळ, माती तसेच जंतु बसतात. त्याने रोगराई पसरण्याची भीती असते. परंतु या वाळवणी यंत्रात भाज्या वाळवल्याने त्या निजंर्तुक राहतात. आम्ही स्वत: हा प्रयोग घरी यशस्वीरीत्या करून पाहिला आहे. या प्रकल्पासाठी भारती बडे यांनी मार्गदर्शन केले आहे.
धुळ्याच्या साक्री तालुक्यातील पिंपळनेर येथील कै. एन. एस. पी. पाटील विद्यालयातील अनिकेत कोठावदे व साहिल भादणे या विद्यार्थ्यांनी पीओपीच्या मूर्तीपासून जैविक खत या विषयावर सादरीकरण केले. या सादरीकरणाला संमेलनात उत्तेजनार्थ परितोषिक मिळाले. यावेळी विद्यार्थ्यांनी संगितले की गणेशोत्सवात समुद्र, तलाव तसेच नद्यांमध्ये पीओपीच्या मूर्ती विसर्जित केल्याने जलप्रदूषण होते. यामुळे पाण्यातील जीवसृस्टीला धोका पोहोचत आहे. अनेकदा मूर्तीचे अवशेष किनारी राहतात. यामुळे किनारे बकाल बनत आहेत. मात्र अमोनियम बायकार्बोनेटचे द्रावण पीओपीमध्ये मिसळल्यास यापासून अमोनियम सल्फेट नावाचे खत बनते. हे खत झाडांना घातल्यास झाडांची ऊंची वेगाने वाढते व झाडांची रोग प्रतिकारक शक्ती वाढते. या खातामुळे झाडांना नायट्रोजन, मिथेन व फॉस्फरस मिळतात. हे खत घेऊन आम्ही अनेक शेतकऱ्यांना भेटी दिल्या. या खताचा पिकांवर चांगला परिणाम जाणवला.