विद्यार्थ्यांची हाणामारी; भिवंडीत एकाचा मृत्यू
By Admin | Updated: September 8, 2015 05:23 IST2015-09-08T05:23:16+5:302015-09-08T05:23:16+5:30
येथील अग्रवाल महाविद्यालयातील दोन विद्यार्थ्यांच्या गटांत भिवंडीतील बापगाव परिसरात हाणामारी झाल्याची घटना सोमवारी दुपारी घडली.

विद्यार्थ्यांची हाणामारी; भिवंडीत एकाचा मृत्यू
कल्याण : येथील अग्रवाल महाविद्यालयातील दोन विद्यार्थ्यांच्या गटांत भिवंडीतील बापगाव परिसरात हाणामारी झाल्याची घटना सोमवारी दुपारी घडली. पूर्ववैमनस्यातून झालेल्या या हाणामारीत विनय विश्वकर्मा या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे, तर मुकुंद भामले, सचदेव घाणेकर, रोशन गोंधळे, नितीन विश्वकर्मा आणि साईनाथ गोंधळे हे पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर कल्याणमधील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असून, याप्रकरणी भिवंडीतील पडघा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.
विद्यार्थ्यांच्या दोन गटांत अनेक दिवसांपासून आगरी आणि कुणबी हा वाद सुरू होता. फेसबुक आणि व्हॉट्सअॅपवर हा वाद चिघळला होता. यात एका मुलीची छेड काढल्यावरून प्रकरण अधिकच तापले. सोमवारी हा वाद विकोपाला गेला आणि बापगाव येथे दोन गटांत हाणामारी होण्याचा प्रकार घडला. यात दुचाकीवरून जाणाऱ्या मुलांना भरधाव वेगात चारचाकी वाहने चालवून धडका देण्यात आल्या तसेच तलवारी आणि चॉपरचे वारदेखील करण्यात आले. या हल्ल्यात १० जण जखमी झाले. यात पाच जणांची प्रकृती गंभीर, तर एकाचा मृत्यू झाला आहे.