विद्यापीठात ३ मार्चला विद्यार्थी दरबार
By Admin | Updated: February 24, 2015 01:10 IST2015-02-24T01:10:07+5:302015-02-24T01:10:07+5:30
पुनर्मूल्यांकनाचा रखडलेला निकाल, हॉलतिकिटातील चुका अशा विविध कामांसाठी विद्यापीठात अनेक चकरा माराव्या लागणा-या विद्यार्थ्यांना दिलासा देण्याचा

विद्यापीठात ३ मार्चला विद्यार्थी दरबार
मुंबई : पुनर्मूल्यांकनाचा रखडलेला निकाल, हॉलतिकिटातील चुका अशा विविध कामांसाठी विद्यापीठात अनेक चकरा माराव्या लागणा-या विद्यार्थ्यांना दिलासा देण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला आहे. विद्यार्थ्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी विद्यापीठाने ३ मार्चला कलिना येथील परीक्षा भवनात विद्यार्थी दरबार आयोजित केला आहे. सकाळी १0.३0 ते १२ या वेळेत प्रभारी कुलगुरू नरेश चंद्र विद्यार्थ्यांच्या तक्रारीचे निरसन करणार आहेत.
मुंबई विद्यापीठाशी संलग्न असलेल्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना विविध कारणांनी विद्यापीठात यावे लागते. हॉल तिकिटातील चुका, गुणपत्रिकांमधील चुका, गुणपत्रिका वेळेत न मिळणे अशा विविध कामांसाठी विद्यार्थ्यांना किमान पाच ते दहा वेळा फेऱ्या माराव्या लागतात. कर्मचाऱ्यांकडून टोलवाटोलवीची उत्तरे देण्यात येत असल्याने विद्यार्थ्यांना काही मिनिटांच्या कामासाठी चार ते पाच महिने हेलपाटे घालावे लागतात. याबाबत विद्यार्थी विद्यापीठाच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त करत असतात. विद्यापीठाचा कारभार गतिमान करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या समस्या तातडीने मार्गी लावण्यासाठी विद्यापीठाने विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी विद्यार्थी दरबार आयोजित करण्यास सुरुवात केली आहे. या दरबारात विद्यार्थ्यांच्या समस्या ऐकून घेण्यात येणार असून त्या सोडविण्यासाठी तातडीने प्रयत्न करण्यात येणार आहेत.
विद्यापीठाने ३ मार्च रोजी आयोजित केलेल्या विद्यार्थी दरबारात विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू स्वत: विद्यार्थ्यांच्या तक्रारी ऐकून घेणार आहेत. प्रभारी कुलगुरूसह विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक, विविध विभागप्रमुख, उपकुलसचिव व साहाय्यक कुलसचिव उपस्थित राहून विद्यार्थ्यांच्या तक्रारींचे निरसन करणार आहेत.