दामलेला झांशीतून अटक
By Admin | Updated: June 10, 2015 02:45 IST2015-06-10T02:45:18+5:302015-06-10T02:45:18+5:30
कुळगाव येथील साई साधना मठावरील दरोड्याप्रकरणी पसार असलेला राष्ट्रवादीचा नगरसेवक आशिष दामले आणि त्याचा सहकारी केवल वर्मा या दोघांना ठाणे ग्रामीण पोलिसांनी मंगळवारी पहाटे झांशीतून अटक केली.
दामलेला झांशीतून अटक
ठाणे : कुळगाव येथील साई साधना मठावरील दरोड्याप्रकरणी पसार असलेला राष्ट्रवादीचा नगरसेवक आशिष दामले आणि त्याचा सहकारी केवल वर्मा या दोघांना ठाणे ग्रामीण पोलिसांनी मंगळवारी पहाटे झांशीतून अटक केली. त्यानंतर त्यांना उल्हासनगर प्रथम न्यायदंडाधिकाऱ्यांच्या समोर हजर केल्याची माहिती ठाण्याचे पोलीस अधीक्षक राजेश प्रधान यांनी दिली.
२ जून रोजी रात्री ११.३० च्या सुमारास कुळगाव, इंदगाव येथील मठात टाकलेल्या दरोड्याचा प्रकार सीसीटिव्ही कॅमेऱ्यात कैद झाला होता. त्यानुसार, दामलेसह २५ ते ३० विरोधात गुन्हा दाखल झाला होता.
याप्रकरणी, कु ळगांव पोलिसांनी दहा जणांना अटक केली होती. मात्र, या गुन्ह्णातील मुख्य सूत्रधार दामले हा पसार होता. त्याला पकडण्यासाठी पोलिसांनी विशेष तीन पथके तयार केली होती. याचदरम्यान, ५ जूनला तो मध्यप्रदेशात असल्याचे समोर आले होते. त्यानुसार ६ जुनला ठाणे पोलिसांच्या एका पथकाने भोपाळ येथील हॉटेलवर छापा टाकला होता. परंतु त्यापूर्वीच तो तेथून निघून गेला होता. त्यामुळे पोलिसांसमोर आव्हान होते.
वारंवार ठिकाणे बदलणाऱ्या दामलेला साथीदारासह अखेर ९ जूनला पहाटे झांशीपासून १८ किलो मीटर अंतरावर असलेल्या ओरसा येथील एका हॉटेलमधून अटक केली. त्यानंतर दोघांना घेऊन ठाणे पोलिसांचे पथक ठाण्याकडे रवाना झाले होते. याप्रकरणी कुळगाव पोलीस पुढील सहाय्यक पोलीस निरीक्षक पोरे करीत आहे.(प्रतिनिधी)
कामगिरी करणाऱ्या पथकाचे कौतुक
मध्य प्रदेशात जाऊन पसार दामलेला अटक करणाऱ्या सहायक पोलीस निरीक्षक एस.बी. हारूगडे आणि सचिन गवस यांच्यासह इतर पाच जणांचे पोलीस अधीक्षकांनी पत्रकार परिषदेत कौतुक केले.
सत्र न्यायालयाने जामीन फेटाळल्यानंतर दामलेने राज्यातून पळ काढला. याचदरम्यान, तो मध्य प्रदेशात असल्याचे समोर आले. त्यानुसार,मंगळवारी पोलिसांच्या पथकाने त्या दोघांना अटक केली. तर या प्रकरणी आतापर्यंत १२ जणांना अटक केली आहे. तो रस्ते मार्गाने पसार झाला होता. तसेच तो वारंवार वास्तव्य बदलत होता. - राजेश प्रधान, पोलीस अधीक्षक, ठाणे