Join us  

मतदारांपर्यंत पोहोण्याची धडपड, उमेदवाराचा थांगपत्ता नाही; मुंबई दक्षिणमध्ये भाजपकडून कार्यक्रमांचा सपाटा

By स्नेहा मोरे | Published: April 19, 2024 11:34 PM

भाजपने या मतदारसंघात वेगवेगळ्या वयोगटातील मतदारांना आकर्षित करण्यासाठी कार्यक्रमांचा सपाटा लावला आहे, मात्र दुसरीकडे उमेदवाराच्या निर्णयाबाबत भाजपातील पदाधिकारीही संभ्रमावस्थेत असल्याचे दिसून येत आहे.

मुंबई : मुंबईतील प्रतिष्ठेचा समजला जाणाऱ्या दक्षिण मुंबईतील मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवाराचा तिढा अजून सुटलेला नाही. उद्धवसेनेच्या अरविंद सावंत यांच्या विरोधात प्रचारात वेग घेण्यासाठी महायुतीतील भाजप या मतदारसंघात कंबर कसत आहे. एकीकडे उमेदवाराचा थांगपत्ता नसताना देखील भाजपची मतदारांपर्यंत पोहोण्याची धडपड सुरु आहे. भाजपने या मतदारसंघात वेगवेगळ्या वयोगटातील मतदारांना आकर्षित करण्यासाठी कार्यक्रमांचा सपाटा लावला आहे, मात्र दुसरीकडे उमेदवाराच्या निर्णयाबाबत भाजपातील पदाधिकारीही संभ्रमावस्थेत असल्याचे दिसून येत आहे.

मुंबई दक्षिण मतदारसंघात नुकतेच भाजपकडून ‘मोदी मित्र’, ‘नमो वाॅरियर्स’, ‘सुपर वाॅरियर्स’ आणि ‘सौंदर्य प्रसाधन प्रशिक्षण शिबिर’ असे विविध उपक्रम घेतले जात आहे. या उपक्रमातंर्गत विविध वयोगटातील, वर्गातील मतदारांना महायुतीचे प्रचारक व मतदार बनविण्यासाठी भाजपकडून प्रयत्न करण्यात येत आहे. त्यात मोदी मित्रमध्ये या मतदारसंघातील डॉक्टर, इंजिनिअर, वकील अशा विविध क्षेत्रातील व्यक्तींना सहभागी करुन घेण्यात आले आहे. नमो वाॅरियर्समध्ये १८ ते २५ वयोगटातील नवमतदारांना पंतप्रधान नरेंद्र मोदींचे विकासाचे व्हिजन, महायुतीचे मेगा प्रोजेक्ट्स, तळागाळात आतापर्यंत केलेले काम, सामान्य गटातील मतदारांशी पंतप्रधान मोदींनी केलेला संवाद अशा स्वरुपाचे दृकश्राव्यफित दाखविण्यात येत आहे. याखेरीस, महिला मतदारांशी जोडण्यासाठी भाजपने शक्कल लढवित मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या लोढा फाऊंडेशनकडून सौंदर्य प्रसाधनांचे प्रशिक्षण शिबिरही घेण्यात येत आहे. दुसरीकडे या मतदारसंघात उमेदवारीचे दावेदार असणाऱ्या लोढा यांनी परिसरातील उद्योजक, समाजसेवक अशा प्रतिष्ठित व्यक्तींच्या कुटुंबातील नव्या पिढीच्या सदस्यांचे समर्थन मिळविण्यास सुरुवात केली आहे, याविषयी सोशल मीडीयावरुन या व्यक्तींचे व्हिडिओही पोस्ट करण्यात येत आहे.

केवळ फक्त प्रचार कार्यक्रमांचे आदेश -भाजप युवा मोर्चाकडून आयोजित नमो वाॅरियर्स उपक्रमात नवमतदारांची गर्दी जमवली खरी, मात्र मतदारसंघात उमेदवार कोण याबाबत पदाधिकारीच अनुत्तरित असल्याचे यावेळी लक्षात आले. भाजप युवा मोर्चाच्या सदस्यांना मतदारसंघातील उमेदवारीविषयी विचारले असता, आम्हाला फक्त प्रचार कार्यक्रम राबविण्याचे आदेश आहेत. उमेदवाराचे नाव तर वरिष्ठ पातळीवर ठरणार असे सांगितले.

७० टक्के मोदी अन् ३० टक्के उमेदवाराचा प्रचार -मतदारसंघात आम्ही तरुण पिढीतील मतदारांचे संघटन करण्याचा प्रयत्न करीत आहोत. नवमतदारांनी महायुतीकडे वळावे यासाठी आतापर्यंत केलेली विकासकामे त्यांच्यापर्यंत पोहोचविण्यात येत आहेत. आमच्यासाठी उमेदवारस्थानी पंतप्रधान मोदी आहेत. त्यामुळे मुंबई दक्षिण मतदारसंघातही उमेदवार नसला तरी आमच्यासाठी पंतप्रधान मोदी उमेदवार आहे, त्यांचा प्रचार ७० टक्के करणार आहोत. तर दुसरीकडे ३० टक्के प्रचार उमेदवार जाहीर झाल्यावर त्याचा करण्यात येईल.

- तेजिंदर सिंग तिवाना, भाजप युवा मोर्चा, मुंबई अध्यक्ष

टॅग्स :लोकसभा निवडणूक २०२४भाजपामुंबईनिवडणूक