सर्जिकल स्ट्राइकवरून राजकारण करणा-यांवर अक्षय भडकला !
By Admin | Updated: October 6, 2016 20:55 IST2016-10-06T20:54:59+5:302016-10-06T20:55:26+5:30
बॉलिवूड स्टार अक्षय कुमारनं आज ट्विटरवरून भारतीय सैनिकांचं जोरदार समर्थन केलं.

सर्जिकल स्ट्राइकवरून राजकारण करणा-यांवर अक्षय भडकला !
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 6 - शहीद जवानांचे कुटुंबीय आणि देशातील हजारो सैनिकांच्या कुटुंबीयांना कोणता सिनेमा प्रदर्शित होणार आहे किंवा कोणत्या कलाकाराला बॅन केलं जाणार, याची चिंता नसून त्यांना त्यांच्या भविष्याची काळजी सतावते आहे, असं म्हणत बॉलिवूड स्टार अक्षय कुमारनं आज ट्विटरवरून भारतीय सैनिकांचं जोरदार समर्थन केलं. गेल्या अनेक दिवसांपासून सर्जिकल स्ट्राईक, कलाकारांवर बंदी याबाबत चर्चा सुरू आहे. सर्जिकल स्ट्राइकवर टीका करणा-यांवर अक्षय कुमारनं जोरदार हल्ला चढवला आहे.
तो म्हणाला, "आज मी तुमच्याशी एक स्टार किंवा सेलिब्रिटी म्हणून बोलत नाही. तर मी तुमच्याशी बोलतोय एका सैनिकाच्या मुलाच्या नात्यानं. गेल्या काही दिवसांपासून आपल्याच लोकांना आपल्याच लोकांशी वाद घालताना मी पाहिलं आहे. काही जण सर्जिकल स्ट्राइकचा पुरावा मागत आहेत, तर काही जण पाकिस्तानी कलाकारांना बॅन करण्याची भाषा करत आहेत.
मात्र त्यांनी उरी हल्ल्यात शहीद झालेल्या निरपराध सैनिकांचा तरी विचार करावा. एक 24 वर्षांचा मुलगा नितीन यादव बारामुल्लात दहशतवादी हल्ल्यात शहीद होतो. त्याच्या कुटुंबीयांनी काय करावे, असा प्रश्न उपस्थित करून सर्जिकल स्ट्राइकवर टीका करणा-यांना अक्षय कुमारनं जोरदार चपराक लगावली आहे.
"गेल्या काही दिवसांपासून माझ्या मनात याविषयी विचार सुरू आहे आणि आज मी त्याला मोकळी वाट करून दिली आहे. त्यामुळे कुणाचाही अपमान करणाचा माझा हेतू नसल्याचंही त्यानं स्पष्ट केलं आहे. अनेक दिवसांपासून मी पाहतोय की, मीडियामधून आपलेच लोक आपल्याच लोकांशी तावातावानं भांडत आहेत. सीमेवरील सैनिकांमुळे आपण सुखचैन जीवन जगत आहोत. त्यामुळे आपल्याला सैनिकांच्या कुटुंबीयांचं वर्तमान आणि भविष्य चांगलं कसं होईल, याची चिंता असली पाहिजे. ते आहेत तर मी आहे, ते आहेत म्हणून तुम्ही आहात, आणि ते नसतील तर हिंदुस्थान नसेल, जय हिंद!", असं म्हणत त्यानं शहिदांच्या बलिदानावर शंका उपस्थित करणा-यांना चोख प्रत्युत्तर दिलं आहे.
Something which has been on my mind since the past few days and I just had to say it. Not intending to offend anyone...so here goes pic.twitter.com/ASaLwobWgu
— Akshay Kumar (@akshaykumar) October 6, 2016