Join us  

'स्वदेशी' विमान बनवणाऱ्या तरुणाला 'उड्डाणा'ची परवानगी मिळेना, मागणार अमेरिकेकडे परवाना!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2019 12:14 PM

आपल्या देशात स्वदेशी तंत्रज्ञानाने विमान निर्मितीचे स्वप्न पाहणाऱ्या कॅप्टन अमोल यादव यांनी अमेरिकेकडे आपल्या विमानासाठी परवाना मागण्याचा निर्णय घेतला आहे.

ठळक मुद्देआपल्या देशात स्वदेशी तंत्रज्ञानाने विमान निर्मितीचे स्वप्न पाहणाऱ्या कॅप्टन अमोल यादव यांनी अमेरिकेकडे आपल्या विमानासाठी परवाना मागण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारी दिरंगाईला कंटाळून उड्डाणासंदर्भात लागणारा परवाना अमेरिकेकडून घेण्याची तयारी दर्शवली आहे. 2018 मध्ये मेक इन इंडिया प्रकल्पांतर्गत एमआयडीसीनं अमोल यादव यांच्या  कंपनीशी 35 हजार कोटींचा सामंजस्य करार केला होता.

मुंबई - आपल्या देशात स्वदेशी तंत्रज्ञानाने विमान निर्मितीचे स्वप्न पाहणाऱ्या कॅप्टन अमोल यादव यांनी अमेरिकेकडे आपल्या विमानासाठी परवाना मागण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारी दिरंगाईला कंटाळून उड्डाणासंदर्भात लागणारा परवाना अमेरिकेकडून घेण्याची तयारी दर्शवली आहे.

'भारतात मी 2011 पासून माझं विमान उडविण्यासाठी लागणाऱ्या परवान्यासाठी प्रयत्न करत आहे. मात्र यासाठी मला अजून किती वेळ प्रतिक्षा करावी लागेल? मला वाटतं आता वेळ आली आहे. माझ्या स्वदेशी तंत्रज्ञानाने तयार करण्यात आलेल्या विमानाच्या उड्डाणासाठी दुसरा मार्ग असेल तर त्याचा मी नक्कीच विचार करेन' असं अमोल यादव यांनी म्हटलं आहे. 

भारतीय बनावटीच्या पहिल्या विमानाचा प्रकल्प 'मेक इन महाराष्ट्र' अंतर्गत महाराष्ट्रात उभारण्याच्या कॅप्टन अमोल यादव यांच्या ध्येयपूर्तीसाठी पालघर जिल्ह्यातील केळवे येथील जमीन देण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या दालनात बैठक झाली होती. त्यावेळी अमोल यादव यांना विमानाच्या प्रकल्पासाठी लागणारी 157 एकर जमीन देण्यासाठी या विमानाला नागरी विमान वाहतूक महासंचालकांचे (डीजीसीए) प्रमाणपत्र मिळणे आवश्यक असल्याने ते मिळविण्यासाठी स्वत: प्रयत्न करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. तसेच 2018 मध्ये मेक इन इंडिया प्रकल्पांतर्गत एमआयडीसीनं अमोल यादव यांच्या  कंपनीशी 35 हजार कोटींचा सामंजस्य करार केला होता. विशेष म्हणजे मॅग्नेटिक महाराष्ट्र परिषदेत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत हा करार करण्यात आला होता. मात्र गेल्या वर्षभरात यादव यांना जागा आणि परवाना मिळालेला नाही.

जाणून घ्या कॅप्टन अमोल यादव यांच्या स्वदेशी विमान निर्मिती प्रकल्पाबद्दल

सरकारी दिरंगाईला कंटाळून अमोल यादव यांनी अमेरिकेकडे आपल्या विमानासाठी परवाना मागण्याचा निर्णय घेतला आहे. अमेरिकेने त्यांना सर्व प्रकारच्या मदतीचे आश्वासन दिले आहे. विमान प्रकल्पासाठी सरकारच्या मागे लागून प्रचंड वेळ वाया जात असल्याची खंतही यादव यांनी  व्यक्त केली आहे. यादव यांच्या या विमान निर्मिती प्रकल्पामुळे महाराष्ट्रातल्या जवळपास दहा हजार बेरोजगारांना रोजगार मिळणार होता. मात्र सरकारकडून अपेक्षित अशी मदत न मिळाल्यामुळे गेल्या वर्षभर हा प्रकल्प रखडला आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राने याबाबतचे वृत्त दिले आहे.

साताऱ्याचे रहिवासी असणाऱ्या अमोल यादव यांनी तब्बल 17 वर्षांच्या मेहनतीनंतर भारतीय बनावटीचे विमान बनवले आहे. मुंबईत राहत असलेल्या इमारतीच्या गच्चीवरच त्यांचे हे प्रयोग सुरू होते. मुंबईतील ‘मेक इन इंडिया’च्या प्रदर्शनानंतर त्यांचा हा यशस्वी प्रयोग पहिल्यांदा जगासमोर आला. त्यानंतर अनेक देशांनी, राज्यांनी, कंपन्यांनी त्यांच्यासमोर विमाने बनविण्याचे प्रस्ताव ठेवले. पण आपल्या महाराष्ट्रातच कंपनी उभारायचे त्यांचे स्वप्न होते. त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने जागा देण्याचे आश्वासन दिले होते. यादव यांनी अमेरिकेत वैमानिक होण्यासाठी प्रशिक्षण घेतले. 

 

टॅग्स :विमानमुंबईअमेरिकादेवेंद्र फडणवीस