Join us
Daily Top 2Weekly Top 5

संप तुमचा, वेठीस धरता आम्हाला?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2019 01:16 IST

संतप्त मुंबईकरांचा सवाल : खासगी वाहतूकदारांची चढ्या दराने भाडे वसुली

मुंबई : सुधारित वेतन करार, दिवाळीतील सानुग्रह अनुदान, बेस्ट उपक्रमाचे महापालिकेत विलीनीकरणासह अशा अनेक मागण्यांसाठी बेस्ट कामगारांनी गेल्या आठवड्यातील सोमवारपासून पुकारलेला संप आठवडा उलटला, तरी सुरूच आहे. बेस्टच्या संपामुळे मात्र प्रवासी बेहाल झाले असून, बेस्ट आणि टॅक्सी चालकांसह खासगी वाहतुकीने चढ्या दराने प्रवासी भाडे वसूल करण्यास सुरुवात केल्याने प्रवाशांचे कंबरडे मोडले आहे. यात भर म्हणून की, काय वाहतूककोंडीने प्रवाशांच्या नाकीनऊ आणले असून, बेस्टच्या संपामुळे प्रवासी आता मेटाकुटीला आले आहेत. परिणामी, बेहाल झालेल्या प्रवाशांनी ‘आम्हाला वेठीस का धरता...’ असा संतप्त सवाल करत, बेस्टच्या संपावर ताशेरे ओढले आहेत.

सात दिवसांपासून सुरू असलेल्या बेस्टच्या संपाचा मंगळवारी आठवा दिवस आहे. गेल्या सात दिवसांपासून रिक्षा आणि टॅक्सीसाठी प्रवाशांना लांबलचक रांगा लावाव्या लागत आहेत. मेट्रोवर गर्दीचा अतिरिक्त ताण पडत आहे. मुंबई शहर आणि उपनगरात खासगी वाहतूक सुरू असली, तरी ती पुरेशी नाही. एसटीसह नवी मुंबई महानगर पालिकेने दिलासा देण्यासाठी त्यांच्या गाड्या रस्त्यावर उतरविल्या असल्या, तरी बेस्टची जागा त्यांना भरता येत नाही. परिणामी, पर्यायी वाहतूक व्यवस्थेवरचा ताण वाढतच असून, प्रवाशांना अक्षरश: ताटकळत आणि लोंबकळून प्रवास करत आहेत.

विशेषत: ऐन पीक अवर म्हणजे सकाळी आणि सायंकाळी रेल्वे स्थानकांबाहेर रिक्षा व टॅक्सीला होणारी गर्दी प्रवाशांच्या नाकीनऊ आणत आहे. बेस्टच्या संपामुळे रिक्षा आणि टॅक्सी, विशेषत: शेअर वाहतुकीने अव्वाच्या सव्वा भाडे घेण्यास सुरुवात केली आहे. परिणामी, प्रवाशांच्या खिशाला भुर्दंड पडत असून, प्रवाशांचा संताप अनावर झाला आहे. महिला प्रवासी, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना संपाचा मोठा फटाका बसून, त्यांनी संपावर नाराजी व्यक्त केली आहे.

बेस्ट वाचायलाच हवीबेस्ट कामगारांनी पुकारलेला संप फक्त कामगारांपुरता मर्यादित नसून तो सर्वसामान्य जनतेसाठीही आहे. बेस्टच्या डेपोखालील जमिनींवर कार्पोरेट्सची नजर असून, ती घशात घालण्यासाठी बेस्ट महाग करण्यात आली आणि तोट्यात गेली. मात्र, हा डाव सर्वसामान्यांनी ओळखला असून, कामगार संघटना कृती समिती बेस्ट वाचविण्यासाठी प्रयत्न करत आहे. गेली पाच वर्षे बेस्टचा अर्थसंकल्प महापालिकेच्या अर्थसंकल्पात विलीन करण्याची मागणी सर्वसामान्य मुंबईकरांनी स्थापन केलेल्या व्यासपीठामधून केली जात आहे. मात्र, आयुक्त या मागणीबाबत गंभीर नाहीत. बाहेरील देशांप्रमाणेच कमीतकमी दरात बेस्टची सुविधा पुरविण्याची गरज आहे. ते हवे असेल, तर संपाचा त्रास सहन करून मुंबईकरांनी कामगार संघटना कृती समितीप्रमाणे बेस्ट कामगार कृती समितीच्या पाठिशी उभे राहणे गरजचे आहे.

- विश्वास उटगी, निमंत्रक-कामगार संघटना कृती समितीबेस्ट तब्बल सहा दिवस धावली नाही, त्यामुळे मुंबईकरांचे हाल झाले. अजून संपावर तोडगा निघालेला नाही. बेस्टची संख्या, मार्गांची संख्या, सेवेच्या परिसराची भव्यता आणि चालक व वाहकांचे कौशल्य या सर्वच बाबीत जगात सर्वोत्कृष्ट गणली जाणारी बेस्टची अवस्था वाईट आहे. या परिस्थितीला प्रशासन, महापालिका आणि सरकारची उदासीनता कारणीभूत आहे. मुंबईकरांसाठी हेच का अच्छे दिन?- आशा कुलकर्णी, विलेपार्ले

विक्रोळी ते मुलुंडपर्यंतच्या प्रवासासाठी बेस्टचा आधार असतो. बेस्टच्या संपामुळे रिक्षाचालक, टॅक्सीचालक जास्तीचे भाडे आकारत आहेत. रोज दिवसाला १५० ते २०० रुपये प्रवासातच जात आहेत. रोजच्या खर्चावर त्याचा परिणाम होत आहे. प्रशासनाने बेस्ट कर्मचाऱ्यांच्या मागण्या लवकरात लवकर मान्य करून आमची सुटका करावी.- मंगल बनकर, विक्रोळीमागील आठवड्यातल्या सोमवारपासून बेस्टचा संप सुरू आहे. आता या आठवड्यातला सोमवार उजाडला, तरी संप मिटलेला नाही. यास कारणीभूत प्रशासन आहे. कामगारांच्या मागण्या सोडविल्याच पाहिजेत, यात दुमत नाही. मात्र, बेस्टने मुंबईला असे वेठीस धरणे अपेक्षित नाही. कारण मुंबईच्या वाहतुकीत लोकल एवढेच बेस्टला महत्त्व आहे. परिणामी, संघटना असो, बेस्ट कामगार असोत, त्यांनी मुंबईकरांचा म्हणजे प्रवाशांचा विचार केला पाहिजे. नाही म्हटले, तरी ही बेस्ट सार्वजनिक वाहतूक सेवा असून, तिच्यावर मुंबई अवलंबून आहे. आपल्या मागण्यांसाठी प्रवाशांना त्रास होईल, अशी भूमिका स्वीकारणे हे योग्य नाही, तसेच प्रशासनानेही त्याकडे दुर्लक्ष करणे हेही चुकीचेच आहे. - राकेश पाटील, कुर्लासध्या सुरू असलेल्या बेस्टच्या संपाचा फटका सर्वांना बसत आहे. ज्या ठिकाणी बेस्ट बसेसशिवाय पर्याय नाही, त्यांच्या वाहतुकीचा खोळंबा झाला आहे. यामुळे रिक्षा आणि खासगी बसवाले सर्वसामान्य नागरिकांकडून जादा दर आकारून परिस्थितीचा गैरफायदा घेत आहेत. काही राजकीय पक्षांनी या परिस्थितीला हाताळण्याची आपापली पद्धत शोधली आहे. यामध्ये स्वत:ची खासगी वाहतूक व्यवस्था असो किंवा जाहीर घोषणा असो. दररोज जाणारे विद्यार्थी बेस्ट बस कधी धावेल? याची वाट पाहत आहेत.- अनुष्का परब, बोरीवली

टॅग्स :बेस्ट