प्रोटोकॉलचे काटेकोरपणे पालन केल्‍यास काळी बुरशीवर प्रतिबंध शक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:06 IST2021-06-24T04:06:08+5:302021-06-24T04:06:08+5:30

फोर्टिस रुग्णालयाचे संशोधन लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : कोविडने पीडित रुग्‍णांमध्‍ये म्‍युकरमायकोसिस (काळी बुरशी) संसर्गाचे वाढते प्रमाण पाहून मुलुंड ...

Strict adherence to the protocol can prevent black fungus | प्रोटोकॉलचे काटेकोरपणे पालन केल्‍यास काळी बुरशीवर प्रतिबंध शक्य

प्रोटोकॉलचे काटेकोरपणे पालन केल्‍यास काळी बुरशीवर प्रतिबंध शक्य

फोर्टिस रुग्णालयाचे संशोधन

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : कोविडने पीडित रुग्‍णांमध्‍ये म्‍युकरमायकोसिस (काळी बुरशी) संसर्गाचे वाढते प्रमाण पाहून मुलुंड येथील फोर्टिस रुग्णालयामधील इंटेन्सिव्‍ह केअर स्‍पेशालिस्‍ट्सनी कोविड-१९ केअर प्रोटोकॉल्‍सचे काटेकोरपणे पालन करण्‍याचे परिणाम व त्‍यामुळे म्‍युकरमायकोसिसच्‍या प्रमाणात होणारी घट याबाबत संशोधन केले. या संशोधनातून असे निदर्शनास आले की, प्रोटोकॉलनुसार स्टेरॉईड्सचा नियंत्रित वापर आणि परिचारिकांच्या देखरेखीअंतर्गत ग्‍लायसेमियावर काटेकोरपणे नियंत्रण राखल्‍यास म्‍युकरमायकोसिसवर प्रतिबंध शक्य आहे.

मुलुंड येथील फोर्टिस रुग्णालयाच्या क्रिटिकल केअरचे संचालक, राज्याच्या कोविड-१९ टास्‍कफोर्सचे, तसेच सर्वोच्‍च न्‍यायालयाने नियुक्‍त केलेल्‍या राष्‍ट्रीय टास्‍कफोर्सचे सदस्‍य डॉ. राहुल पंडित यांच्‍यासह मुलुंड येथील फोर्टिस हॉस्पिटलमधील क्रिटिकल केअरच्‍या सल्‍लागार डॉ. बिंदू एम. आणि क्रिटिकल केअरचे सहयोगी संचालक डॉ. चारूदत्त वैती यांनी हे संशोधन व त्याचे नेतृत्‍व केले.

मुलुंड येथील फोर्टिस रुग्णालयाने मार्च २०२० ते मे २०२१ दरम्‍यान इंटेन्सिव्‍ह केअर युनिटमध्‍ये भरती करण्‍यात आलेल्या १०२७ आणि वॉर्डामध्‍ये भरती करण्‍यात आलेल्‍या ४२२१ रुग्‍णांचा अभ्यास केला. रुग्‍णांच्‍या या समूहामध्‍ये म्‍युकरमायकोसिसची एकही घटना आढळून आली नाही. आयसीयूमध्‍ये भरती करण्‍यात आलेल्‍या १०२७ रुग्‍णांपैकी ९१५ रुग्‍णांवर स्टेरॉईड थेरपीचा उपचार करण्‍यात आला. १०२७ पैकी ४१७ रुग्‍ण मधुमेहाने पीडित होते. ६७ रुग्‍णांना सायटोकाइन स्ट्रॉमसाठी स्टेरॉईड्स देण्‍याव्‍यतिरिक्‍त टोसिलीझुमॅब या मोनोक्‍लोनल ॲण्‍टीबॉडीचा एकच डोस देण्‍यात आला.

८४२ रुग्णांमध्‍ये (८२ टक्‍के) त्‍यांच्‍या रक्‍तातील साखरेची पातळी १४०-१८० मिलिग्रॅम/डेसिलिटर दरम्‍यान ठेवण्‍यात आली. तसेच, ५३६ रुग्‍णांचा इनबिल्‍ट ह्युमिफाईड सर्किटचा वापर करत हाय फ्लो नॅसल कॅनुला (एचएफएनसी)चा वापर करण्‍यात आला. इन्‍वेसिव्‍ह मेकॅनिकल व्‍हेंटिलेटरवर असलेल्‍या २२७ रुग्‍णांचा हीट एक्‍स्‍चेंज मॉइश्‍चरायझिंग (एचएमई) फिल्‍टर्सचा वापर करण्यात आला, ५६ रुग्‍णांना एचएमईचा वापर करत नॉन-इन्‍वेसिव्‍ह व्‍हेंटिलेशनची गरज भासली आणि उर्वरित १४७ रुग्‍णांना ड्राय ऑक्सिजन देण्‍यात आले.

* म्‍युकरमायकोसिसची एकही केस आढळून आली नाही

देशभरातील म्‍युकरमायकोसिस संसर्गाला प्रतिबंध करण्‍यासाठी धोरणे आखण्‍यामध्‍ये साह्यभूत ठरेल. अनेक आयसीयू व कोविड केंद्रांमध्‍ये भरती केलेल्‍या रुग्‍णांमध्‍ये म्‍युकरमायकोसिस केसेसचे वाढते प्रमाण पाहता आरोग्‍यसेवा प्रदात्यांनी योग्‍यपणे स्टेरॉईड्सचा वापर करणे अत्‍यंत महत्त्वाचे आहे. त्‍यांच्‍याकडे रुग्‍णांसाठी नर्सेसद्वारा संचालित मॉनिटरिंग सिस्टीम, तसेच उत्तम मधुमेह नियंत्रण नियोजन असले पाहिजे. भरती करण्‍यात आलेल्‍या रुग्‍णांमध्‍ये म्‍युकरमायकोसिसची एकही केस आढळून आली नाही; यामागील कारण म्‍हणजे स्टेरॉईड उपचार, कालावधी व ग्‍लुकोज नियंत्रणासंदर्भात प्रोटोकॉल्‍सचे काटेकोरपणे पालन केले, असे डॉ. राहुल पंडित यांनी सांगितले.

* बायोसेफ्टीचा दर्जा राखला पाहिजे!

संशोधनातील इतर पैलूंमधून नर्सेसनी रुग्‍णांच्या घ्‍यावयाच्‍या पूर्वकाळजीचे महत्त्व निदर्शनास येते. रुग्‍णांच्‍या या समूहामध्‍ये इतर इम्‍यूनोमॉड्युलेटरी औषधांचा वापर फारच कमी होता. फक्‍त ६७ रुग्‍णांना टोसिलीझुमॅबचा एकच डोस देण्‍यात आला. हेही लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की, नर्सेसच्या देखरेखीदरम्‍यान ऑक्सिजन ह्युमिडीफिकेशन प्रोटोकॉल्‍स व बायासेफ्टीचा उच्‍च दर्जा राखला पाहिजे, असे संशाेधनाअंती समाेर आले.

.........................................

Web Title: Strict adherence to the protocol can prevent black fungus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.