बेटेगाव पुलाची धडधड थांबणार
By Admin | Updated: July 13, 2015 23:10 IST2015-07-13T23:10:55+5:302015-07-13T23:10:55+5:30
बोईसर पूर्वेकडील बेटेगावसह बिरवाडी, कल्लाळे, पंचाळी व कांबळगाव इ. गावांकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावरील बेटेगाव येथील कमकुवत झालेल्या पुलावरील

बेटेगाव पुलाची धडधड थांबणार
बोईसर : बोईसर पूर्वेकडील बेटेगावसह बिरवाडी, कल्लाळे, पंचाळी व कांबळगाव इ. गावांकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावरील बेटेगाव येथील कमकुवत झालेल्या पुलावरील अवजड वाहतूक बंद करण्याची शिफारस तांत्रिक तपासणी (स्ट्रक्चरल आॅडिट) करणाऱ्या बांद्रा पॉलिटेक्निकलच्या सिव्हील विभागाने आपल्या अहवालात केल्याने ग्रामस्थांच्या मागणीला अखेर यश आले आहे.
हा रस्ता जिल्हा परिषदेच्या अंतर्गत येत असून रस्त्याची दुरुस्ती व डागडुजीवर बेटेगाव ग्रामपंचायतीने लाखो रुपये खर्च केले आहेत. मात्र, दोन वर्षांपासून सदर पुलावरून मान व पंचाळी ग्रामपंचायत क्षेत्रांत सुरू असलेल्या गृहसंकुलांसाठी लागणाऱ्या बांधकाम साहित्याची वाहतूक मोठ्या प्रमाणात होऊन मुख्य रस्ता व नाल्यावरील पुलाच्या खालील भागातील काँक्रीटचा थर लोखंडी सळयापासून सुटा होऊन पडत असल्याने पूल कमकुवत होऊन कोसळण्याची शक्यता बेटेगाव ग्रामपंचायतीने संबंधित अधिकाऱ्यांना दिलेल्या पत्रात व्यक्त केली होती.
नऊ मीटरचे तीन स्पॅन असलेला २७ मीटर लांब व ४.८० मीटर रुंद असलेला पूल सुमारे ३५ वर्षांपूर्वी बांधला असून पुलाखालील भाग अवजड वाहनांमुळे कमकुवत होत असल्याचे निदर्शनास येताच १२ सप्टेंबर २०१४ च्या ग्रामसभेने पुलावरून अवजड वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेऊन २९ नोव्हेंबरपासून ग्रामपंचायतीने बंदी अमलात आणली. मात्र, सदर निर्णय विकासकामांना अडथळा आणणारा असल्याचे तेथील तीन मोठ्या गृहसंकुलांतर्फे शासनदरबारी मांडून तेथे अनेक बैठकाही घेण्यात आल्या. मात्र, ग्रामस्थांनी सदर विषयाचा पाठपुरावा करून कमकुवत झालेल्या पुलावर अपघात झाल्यास त्याला जबाबदार कोण, असा प्रतिप्रश्न करून सर्व बैठकांमध्ये पुलावरील अवजड वाहतूकबंदीबाबत ठाम राहिल्याने अखेर मे २०१५ मध्ये पुलाची तांत्रिक तपासणी करण्यात आली. त्यानंतर आलेल्या अहवालात अखेर अवजड वाहतूकबंदीवर शिक्का मोर्तब करण्यात आले. (वार्ताहर)
पावसाळ्यानंतर काम सुरू होणार
पुलाची तांत्रिक तपासणी करून दिलेल्या पाहणी अहवालात पुलाच्या काँक्रीटमधील लोखंडाचा उघडा पडलेला मार्ग, पुलाच्या स्लॅबला गेलेला तडा याबाबतचा उल्लेख करून पुलाचे एक्स्पॉन्शन जॉइंटही बदलण्यासंदर्भात सुचविण्यात येऊन पुलाचे वजन पेलण्याची क्षमता कमी झाल्याने वरून अवजड वाहतूक बंद करण्याची शिफारस अहवालात करण्यात आली असून दुरुस्ती तातडीने करण्याचे सुचविण्यात आले आहे. मात्र, पुलाखालून पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणी वाहणार असल्याने तो संपल्यानंतरच तातडीने काम हाती घ्यावे लागणार आहे.