‘बेस्ट’च्या आधुनिकीकरणाला ताकद देणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:26 IST2021-02-05T04:26:16+5:302021-02-05T04:26:16+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : लॉकडाऊनच्या काळात जीवनावश्यक कर्मचाऱ्यांच्या वाहतुकीसाठी आपल्या हक्काची बेस्ट धावून आली, पण बदलत्या मुंबईच्या वाहतूक ...

‘बेस्ट’च्या आधुनिकीकरणाला ताकद देणार
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : लॉकडाऊनच्या काळात जीवनावश्यक कर्मचाऱ्यांच्या वाहतुकीसाठी आपल्या हक्काची बेस्ट धावून आली, पण बदलत्या मुंबईच्या वाहतूक व्यवस्थेतही बदल होत आहेत. मेट्रोसह विविध पर्यायी वाहतूक व्यवस्थेमुळे बेस्टला स्पर्धा निर्माण झाली आहे. अशावेळी ‘बेस्ट’ आधुनिकीकरणाच्या दृष्टीने भक्कम पाऊले टाकत आहे. या पावलांना ताकद देण्यात येईल, असे आश्वासन देत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आर्थिक संकटात असलेल्या बेस्ट उपक्रमाला दिलासा दिला.
वडाळा येथील बेस्ट उपक्रमाच्या अद्ययावत बस नियंत्रण कक्षाचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते दूरदृश्यप्रणालीद्वारे शुक्रवारी करण्यात आले. यावेळी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, महापौर किशोरी पेडणेकर, महापालिका आयुक्त इकबालसिंह चहल, बेस्ट समितीचे अध्यक्ष प्रवीण शिंदे, बेस्टचे महाव्यवस्थापक सुरेंद्र बागडे, आदी उपस्थित होते. अन्य वाहतूक सेवेमुळे स्पर्धेत टिकण्यासाठी बेस्टला काळानुरुप पर्यायी मार्गांचा विचार करावा लागेल, असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
बेस्ट उपक्रमाचे कमांडिंग सेंटर ही अभिनव कल्पना आहे. या नियंत्रण केंद्रामुळे बाहेरुन येणाऱ्या प्रवाशांना माहिती मिळेल. त्यासाठीचे ॲपही उपयुक्त ठरेल. असे हे सर्व उपक्रम प्रवाशांच्या सुविधेच्या दृष्टीने महत्त्वाचे आणि कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले. कोरोना विरुद्धच्या युद्धात बेस्ट उपक्रमातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी ‘बेस्ट’ योगदान दिले. त्यासाठी मुंबईकर कृतज्ञच राहतील, अशा शब्दात त्यांनी अधिकारी-कर्मचाऱ्यांची पाठ थोपटली.
असा असेल बस नियंत्रण कक्ष
* बससेवेमध्ये अनियमितता आल्यास संबंधित विभागीय वाहतूक अधिकाऱ्यांना कार्यवाही करण्याच्या सूचना.
* प्रवाशांना बससेवेबाबत माहिती पुरविण्यात येईल. नव्याने मुंबईत येणाऱ्या प्रवाशांना त्यांच्या पुढील प्रवासाबाबत मार्गदर्शन करण्यात येईल.
* ‘बेस्ट प्रवास ॲप’द्वारे प्रवाशांना त्यांच्या अपेक्षित बसमार्गाबाबत माहिती, बसगाडीची बसथांब्यावर येण्याची अचूक वेळ, मुंबईतील वेगवेगळ्या ठिकाणी प्रवासाकरिता कोणते बसमार्ग आहेत, याची माहिती ॲपवर मिळेल.
* अपघात घडल्यास बेस्ट कर्मचाऱ्यांसह पोलीस, अग्निशमन दल, महापालिका या यंत्रणांना कळवून जखमी प्रवाशांना तत्काळ औषधोपचार उपलब्ध होतील, याची खबरदारी घेण्यात येईल.
....................