ताकद लागणार पणाला
By Admin | Updated: September 29, 2014 01:00 IST2014-09-29T01:00:29+5:302014-09-29T01:00:29+5:30
महाराष्ट्रात काँग्रेस - राष्ट्रवादी आघाडी तुटल्यामुळे प्रत्येक विधानसभा क्षेत्रात एक उमेदवार देणे क्रमप्राप्त ठरले आहे.

ताकद लागणार पणाला
नादगांव : महाराष्ट्रात काँग्रेस - राष्ट्रवादी आघाडी तुटल्यामुळे प्रत्येक विधानसभा क्षेत्रात एक उमेदवार देणे क्रमप्राप्त ठरले आहे. पक्ष अध्यक्ष तटकरे यांच्या आदेशान्वये त्यांनी फॉर्म दाखल करण्याचे आदेश आले होते. सगळीकडेच फुटाफुटीचे राजकारण चालू असून याचा फटका जिल्ह्यातील राजकारणालाही बसल्याचे दिसून येत आहे. एकंदरच यावेळच्या निवडणुकीत सगळ्याच पक्षांची ताकद पणाला लागण्याची चिन्हे आहेत.
जिल्हा उपाध्यक्ष मंगेश दांडेकर यांनी राष्ट्रवादीच्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक आपल्या निवासस्थानी बोलावली होती. मुरुड नगरपरिषदेत राष्ट्रवादी पक्षाचे १२ नगरसेवक आहेत. त्यापैकी चार अनुपस्थितीत तालुका अध्यक्ष, शहर अध्यक्ष आदींसह प्रमुख कार्यकर्ते या वेळी उपस्थित होते. अलिबाग - मुरुड विधानसभेचा फॉर्म दाखल करण्यावर विचार विनिमय झाला असता सर्व कार्यकर्त्यांनी फॉर्म दाखल न करण्याचा सल्ला दिला असे विश्वसनीय कळते. प्रचाराला उरलेले कमी दिवस तसेच राष्ट्रवादीचे जिल्हा परिषद सदस्य महेंद्र दळवी हे पक्ष त्यागून शिवसेनेत गेल्यामुळे अलिबाग - मुरुड विधानसभा क्षेत्रात राष्ट्रवादी पक्षाची ताकद फार क्षीण झाली आहे. मुरुड तालुक्यात अस्तित्व आहे पण भल्या मोठ्या अलिबाग तालुक्यात राष्ट्रवादी पक्षाला मतदान मिळू शकत नाही ही कार्यकर्त्यांची भावना होती. म्हणून यावेळी वातावरण अनुकूल नसल्याने फॉर्म भरु नये असे कार्यकर्त्यांनी दांडेकर यांना सांगितल्याने मंगेश दांडेकर यांनी माघार घेवून फॉर्म दाखल न करण्याचा निर्णय घेतला. कार्यकर्त्यांनी घेतलेला हा निर्णय तातडीने भ्रमणध्वनीद्वारे जिल्हाध्यक्ष वसंत ओसवाल यांना कळवण्यात आला. या मतदार संघात पक्षाची स्वतंत्र ताकद नाही की, उमेदवार निवडून येईल तेव्हा येथे अन्य पक्षास सहकार्य केले तर उचित ठरेल असे विश्लेषकांचे म्हणणे आहे.