सत्ताधा-यांच्या मतांचा टक्का घसरला

By Admin | Updated: October 23, 2014 00:01 IST2014-10-23T00:01:52+5:302014-10-23T00:01:52+5:30

विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यास सुरुंग लावण्यास विरोधकांना यश आले आहे. राष्ट्रवादीला २००९ मध्ये दोन्ही मतदार संघामध्ये ४५.४५ टक्के मते मिळाली होती.

The strength of the ruling party declined | सत्ताधा-यांच्या मतांचा टक्का घसरला

सत्ताधा-यांच्या मतांचा टक्का घसरला

नामदेव मोरे, नवी मुंबई
विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यास सुरुंग लावण्यास विरोधकांना यश आले आहे. राष्ट्रवादीला २००९ मध्ये दोन्ही मतदार संघामध्ये ४५.४५ टक्के मते मिळाली होती. यावेळी मात्र दोन्ही ठिकाणी सरासरी ३३ टक्के मते मिळाली असून घसरलेल्या जनाधारामुळे महापालिकेच्या निवडणुकीमध्ये सत्ताधाऱ्यांची कसोटी लागणार आहे.
नवी मुंबईवर अनेक वर्षांपासून गणेश नाईक यांची एकहाती सत्ता होती. नाईक परिवारामध्ये दोन आमदार, एक खासदार, महापौर अशी सर्व पदे एकवटली होती. परंतु लोकसभा निवडणुकीपासून नाईक व पर्यायाने राष्ट्रवादी काँगे्रसचा जनाधार घसरू लागला आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये ऐरोली मतदार संघामध्ये २०४३४ व बेलापूरमध्ये २५७८४ मतांनी शिवसेनेला मताधिक्य मिळाले होते.
विधानसभा निवडणुकीमध्येही दोन्ही मतदार संघांमध्ये अत्यंत चुरशीची लढत झाली. ऐरोली मतदार संघामध्ये जवळपास १८ व्या फेरीपर्यंत राष्ट्रवादी पाठीमागे होती. खैरणे, बोनकोडे, महापे व तुर्भे परिसरामध्ये चांगली मते मिळाल्यामुळे संदीप नाईक ८७२५ मतांनी विजयी झाले. त्यांना एकूण मतांच्या जवळपास ३७ टक्के मते मिळाली. १४ विरोधकांच्या मतांची टक्केवारी ६३ टक्के एवढी आहे. २००९ च्या निवडणुकीमध्ये संदीप नाईक यांना तब्बल ५०. १३ टक्के मते मिळाली होती, तर त्यांच्या विरोधकांना ४९.८७ टक्के मतेच मिळाली होती.
बेलापूर मतदार संघाचे विभाजन होण्यापूर्वी गणेश नाईक एक लाखपेक्षा जास्त फरकाने विजय होत होते. त्यांच्या मताधिक्याची दखल लिम्का बुकने घेतली होती. परंतु विभाजनानंतर २००९ च्या निवडणुकीमध्ये नाईक यांना एकूण मतांच्या ४०.७८ टक्के मते मिळाली होती. या वर्षी भाजपाच्या मंदा म्हात्रे यांनी त्यांचा पराभव केलाच, शिवाय त्यांच्या मतांची टक्केवारीही २९ टक्के एवढी झाली आहे. त्यांच्या विरोधकांना ७० टक्के तर १ टक्का मतदारांनी नोटाचा पर्याय वापरला आहे. प्रत्येक निवडणुकीमध्ये मतांचा टक्का घसरत चालला आहे.
मागील काही वर्षांत नवी
मुंबई म्हणजे नाईक व नाईक म्हणजे नवी मुंबई असे समीकरण झाले होते. परंतु सर्व पदे एकाच घरात एकवटल्यामुळे व राज्य शासनाविषयी नागरिकांमध्ये असणारी नकारात्मक प्रतिमा यामुळे राष्ट्रवादीचा येथील जनाधार घसरू लागला असून विरोधकांच्या मतांमध्ये वाढ होवू लागली आहे.

Web Title: The strength of the ruling party declined

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.