तमाशा महोत्सवाची सांगता
By Admin | Updated: February 5, 2015 22:49 IST2015-02-05T22:49:36+5:302015-02-05T22:49:36+5:30
महाराष्ट्र शासनाच्यावतीने गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेल्या राज्यढोलकी फड तमाशा महोत्सवाची बुधवारी नवी मुंबईमधील वाशी येथे तेवढ्याच दिमाखात सांगता झाली.

तमाशा महोत्सवाची सांगता
पनवेल : महाराष्ट्र शासनाच्यावतीने गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेल्या राज्यढोलकी फड तमाशा महोत्सवाची बुधवारी नवी मुंबईमधील वाशी येथे तेवढ्याच दिमाखात सांगता झाली. या महोत्सवाला तमाशाप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. बुधवारी महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी संगीता महाडिक पुणेकर लोकनाट्य तमाशा मंडळाने सादर केलेल्या कार्यक्रमातून महोत्सवाची सांगता झाली. महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांची या ठिकाणी प्रमुख उपस्थिती लाभली.
महोत्सवाच्या पहिल्या दिवशी भिमाभाऊ सांगवीकर यांना तमाशासम्राज्ञी विठाबाई नायगावकर जीवनगौरव पुरस्कार देवून गौरविण्यात आले. गेल्यावर्षीच्या पुरस्काराच्या मानकरी प्रभाताई शिवणेकर यांच्या हस्ते हा पुरस्कार भिमाभाऊना सुपूर्द करण्यात आला. सन्मानचिन्ह, मानपत्र व पाच लाख रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप होते. ३१ जानेवारी ते ४ फेब्रुवारी या पाच दिवसांच्या कालावधीत महाराष्ट्रातील नावाजलेल्या कलाकारांनी याठिकाणी आपली कला सादर केली. यामध्ये रघुवीर खेडेकरांसह कांताबाई सातारकर लोकनाट्य तमाशा मंडळ संगमनेर, काळू बाळू तमाशा मंडळ सांगली, मंगला बनसोडे लोकनाट्य तमाशा कराड, रेखा पाटील कोल्हापूरकर तमाशा मंडळ कोल्हापूर तसेच संगीता महाडिक पुणेकर आदींनी याठिकाणी कार्यक्र म सादर केले.
या महोत्सवाच्या यशस्वी आयोजनाबाबत राज्यातील सांस्कृतिक विभागाचे संचालक अजय आंबेकर यांनी सांगितले की, या महोत्सवाला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला. टीव्ही तसेच इंटरनेटच्या जगात आजही लोकांंना जिवंत कला अनुभवण्याची तेवढीच आवड असल्याचे येथे पहावयास मिळाले आणि त्याचा आनंद झाला. लोककलेला जास्तीत जास्त महत्वप्राप्त करुन देण्याच्या दृष्टीने राज्याचा सांस्कृतिक विभाग प्रयत्नशील राहील, असेही त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)