कणकवली परिसरात वादळी वाऱ्याने दाणादाण
By Admin | Updated: September 26, 2014 23:29 IST2014-09-26T22:22:58+5:302014-09-26T23:29:57+5:30
वागदेत झाड पडल्याने महामार्ग ठप्प

कणकवली परिसरात वादळी वाऱ्याने दाणादाण
कणकवली : वादळी पावसाने शुक्रवारी सायंकाळी कणकवली आणि परिसरात दाणादाण उडवली. नाईक पेट्रोलपंपानजीक मोठे झाड पडून महामार्ग दोन तास ठप्प झाला होता. ठिकठिकाणी झाडे पडून नुकसान झाले.
शुक्रवारी सायंकाळी ४ वाजता मुसळधार पाऊस सुरू झाला. त्याच्याबरोबर सोसाट्याचा वाराही सुटल्याने वागदे परिसरात झाडे उन्मळून पडली. नाईक पेट्रोलपंपानजीक मोठे आंब्याचे झाड उन्मळून महामार्गावर पडले आणि वाहतूक ठप्प झाली. हे झाड विद्युतवाहिन्यांवर पडल्याने वाहिन्यांसह वीज खांब पडले. त्यामुळे दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या. याबरोबरच मराठा मंडळ मार्गावर गोपुरीनजीक दोन-तीन ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याने तोही मार्ग बंद झाला होता. वीज कर्मचाऱ्यांनी वीज पुरवठा खंडीत केला. तोपर्यंत ग्रामस्थांनीच झाडे तोडून रस्ता मोकळा करण्यासाठी पुढाकार घेतला. वागदे सरपंच संदीप सावंत यांनी जेसीबी मागवून रस्ता मोकळा केला. रमेश काणेकर, रमा काणेकर, बाबू गावडे, सचिन काणेकर, अनंत सावंत, मंगेश नेवगे आदींनी मदत कार्यात सहभाग घेतला. वागदे, बौद्धवाडी येथील अच्युत कदम, मधुकर कदम यांच्या घरावर फणसाची झाडे कोसळून नुकसान झाले.
वादळाने दाणादाण उडवलेली असताना आपत्कालीन यंत्रणा जागी झाल्याचे दिसले नाही. वागदे तलाठी शिरसाट, कणकवली पोलिसांचे पथक आणि वीज कर्मचारी घटनास्थळी उपस्थित झाले होते.
कणकवली शहरात शिवाजी चौकानजीक एका हॉटेलचे पत्रे उडाले. काही झाडे तुटून पडली. तर बिजलीनगर परिसरात तीन ट्रान्सफॉर्मर उन्मळून पडल्याने वीज पुरवठा ठप्प झाला. वरवडे परिसरात झाडे तुटून नुकसान झाल्याचे वृत्त आहे.
कणकवली शहर परिसरातही ठिकठिकाणी झाडांच्या फांद्या तुटून पडल्या. पोलीस वसाहतीवर झाड उन्मळून पडल्याने नुकसान झाले. वीज वाहिन्यांवर हे झाड पडल्याने वीज पुरवठा खंडीत झाला. या वादळी पावसाने वीज कंपनीचे मोठे नुकसान झाले आहे. वीज कर्मचाऱ्यांनी नुकसानीचा अंदाज घेत काम सुरू केले होते.
वागदे परिसरात सायंकाळी उशिरापर्यंत वीज पुरवठा खंडीत होता. वीज कंपनीच्या अभियंत्यांनी रात्री उशिरापर्यंत वागदेतील वीज पुरवठा सुरळीत करण्यात येईल, असे सांगितले. मात्र, बिजलीनगर परिसरात ट्रान्सफॉर्मर कोसळून पडल्याने शनिवारीच वीज पुरवठा सुरळीत होऊ शकतो, असे सांगण्यात आले.
गुरूवारी सायंकाळी वादळी पावसाने तालुक्यात काही ठिकाणी नुकसानीच्या घटना घडल्या. हुंबरठ येथील फारूख अब्दुल काझी यांच्या गॅरेजचे ११ हजार ७०० रूपये, हरकुळ बुद्रुक येथील आनंदीबाई नामदेव ठाकूर यांच्या घराचे ४ हजार रूपये, सुलोचना लक्ष्मण नारकर यांच्या घराचे ६ हजार ५०० रूपये, ओटव ग्रामपंचायतीची कौले उडून ३ हजार रूपये, अनिल राजाराम कांबळी यांच्या छपराचे पत्रे उडून १८०० रूपयांचे नुकसान झाल्याची नोंद झाली
आहे. (प्रतिनिधी)