वाशीतील भुयारी मार्गाचे काम बंदच
By Admin | Updated: May 3, 2015 23:29 IST2015-05-03T23:29:35+5:302015-05-03T23:29:35+5:30
वाशी सेक्टर ६ मधील भुयारी मार्गाच्या कामास ठाणे जिल्ह्णाचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्थगिती दिली आहे. अद्याप हे काम बंद असून त्यामुळे

वाशीतील भुयारी मार्गाचे काम बंदच
नवी मुंबई : वाशी सेक्टर ६ मधील भुयारी मार्गाच्या कामास ठाणे जिल्ह्णाचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्थगिती दिली आहे. अद्याप हे काम बंद असून त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. त्यामुळे शिवसेनेला दोन प्रभागांमध्ये फटका बसला असून आतातरी काम सुरू करावे, अशी अपेक्षा नागरिक करत आहेत.
वाशी सेक्टर ६ मध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाने वाशी गाव व सिडको विकसित नोडकडे ये -जा करण्यासाठी भुयारी मार्गाचे काम सुरू केले आहे. भुयारी मार्गाच्या दोन्ही बाजूच्या सर्व्हिस रोडचे काम महानगरपालिकेने गेल्या वर्षी सुरू केले होते. काम पूर्ण झाल्यानंतर सेक्टर ६ परिसरातील नागरिकांना मुंबई व पुण्याकडे जाण्यासाठी वाशीतील मुख्य चौकामध्ये येण्याची गरज भासणार नाही. या परिसरातील वाहतूक कोंडी सुटणार आहे. परंतु या कामामुळे रस्त्याच्या बाजूला राहणाऱ्या नागरिकांना वाहनांच्या आवाजाचाही त्रास होऊ शकतो. यामुळे शिवसेनेचे बेलापूर मतदार संघ संपर्क प्रमुख विठ्ठल मोरे यांनी ठाणे जिल्ह्णाचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रार करून या कामास १६ मार्चला स्थगिती दिली आहे. काम बंद असल्यामुळे नागरिकांचीच गैरसोय होत आहे. काँगे्रसने गेल्या महिन्यामध्ये या ठिकाणी श्रमदान आंदोलन करून पालकमंत्र्यांचा स्थगिती आदेश चुकीचा असल्याचे निदर्शनास आणून दिले होते.
भुयारी मार्ग व रोडच्या कामाला केलेल्या विरोधाची मोठी किंमत शिवसेनेला निवडणुकीत मोजावी लागली. पक्षाचे ज्येष्ठ पदाधिकारी विठ्ठल मोरे यांचा प्रभाग ६० मधून तब्बल १३८७ मतांनी पराभव झाला. त्यांच्या सूनबाई अनुश्री मोरे यांचाही एक हजार १४७ मतांनी पराभव झाला आहे. निकालानंतरही या ठिकाणचे काम अद्याप सुरू झालेले नाही. नागरिकांनी कच्च्या रस्त्याचा वापर सुरू केला आहे. येथील काम लवकर पूर्ण व्हावे, अशी मागणी होऊ लागली आहे. पालकमंत्री आतातरी जनहित लक्षात घेऊन, स्थगिती उठवून नागरिकांची गैरसोय दूर करतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.