नव्या मंडळांना शिवजयंती मिरवणुकांपासून रोखा!
By Admin | Updated: March 7, 2015 01:41 IST2015-03-07T01:41:41+5:302015-03-07T01:41:41+5:30
शिवजयंतीला नवी मंडळे, मिरवणुकांचे नवे मार्ग याबाबत मुंबई पोलिसांनी काढलेले आदेश महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी झुगारले आहेत.

नव्या मंडळांना शिवजयंती मिरवणुकांपासून रोखा!
मुुंबई : शिवजयंतीला नवी मंडळे, मिरवणुकांचे नवे मार्ग याबाबत मुंबई पोलिसांनी काढलेले आदेश महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी झुगारले आहेत. महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करायला कोणाच्याही परवानगीची गरज नाही. आपल्या महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात, दिमाखात आणि जोशात साजरी करा, असे आदेश त्यांनी कार्यकर्त्यांना दिले आहेत. त्यामुळे ८ मार्च रोजी तिथीनुसार साजऱ्या होणाऱ्या शिवजयंतीला परवानगीवरून पोलीस आणि मनसे कार्यकर्त्यांमध्ये राडा होण्याची शक्यता आहे.
मुंबईचे सह पोलीस आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) धनंजय कमलाकर यांनी शिवजयंतीबाबत शहरातील पोलिसांना विशेष सूचना दिल्या असून, कोणत्याही परिस्थितीत नवीन मंडळांना अथवा मिरवणुकीला परवानगी देऊ नका, अशा सूचना सर्वांना केल्या आहेत.
दुसरीकडे शिवजयंती धडाक्यात आणि उत्साहात साजरी करा, महाराजांची जयंती महाराष्ट्रात साजरी करायला कोणाच्याही परवानगीची गरज नाही. त्यामुळे पक्षातील माझ्या सर्व सहकाऱ्यांनी आपल्या महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात, दिमाखात आणि जोशात साजरी करा, असे आदेश मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिले आहेत.
कुठलीही मिरवणूक काढण्यासाठी गृह विभागाची परवानगी घ्यावी लागते. तशी तरतूद पोलिसांच्या मॅन्युअलमध्ये आहे. एखाद्या मंडळाला मिरवणुकीचा पारंपरिक मार्ग बदलून हवा असल्यास शासनाची (गृह विभाग) परवानगी बंधनकारक आहे.
नव्या मंडळांना परवानगी देऊ नका, या सूचनेमागे मिरवणुकांच्या मार्गात बदल नकोत असा अर्थ अभिप्रेत असल्याचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने ‘लोकमत’ला सांगितले. (प्रतिनिधी)
छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती संपूर्ण राज्यात मोठ्या उत्साहात आणि जोशात साजरी झाली पाहिजे. गल्लीपासून संपूर्ण विभागात विविध कार्यक्रम, उपक्रम घ्या. मोठ्या दिमाखात आणि उत्साहात मिरवणुका काढा. सर्वांना कळू द्या, आपल्या राजाची जयंती आहे.
- राज ठाकरे, अध्यक्ष, मनसे
शिवजयंतीनिमित्त शहरातल्या नाक्यानाक्यावर, गल्लीबोळात पोलीस बंदोबस्त असेल. शिवजयंतीला निघणाऱ्या प्रत्येक छोट्यामोठ्या मिरवणुकीसोबत पोलिसांचे एस्कॉर्ट असेल. मिरवणुकीदरम्यान येणाऱ्या संवेदनशील ठिकाणांची माहिती घेऊन त्या ठिकाणी पोलिसांचा विशेष बंदोबस्त असेल.
- राकेश मारिया, मुंबई पोलीस आयुक्त