Join us  

ईडीचे प्रयोग थांबवा; जनता चिडली; गजानन कीर्तिकर यांनी साधला भाजपवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2024 1:01 PM

उद्धवसेनेकडून लढणारा मुलगा अमोलची केली पाठराखण, तणावात ठेवण्यासाठी बोलावतात

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : भाजपला देशभरातून भक्कम पाठिंबा आहे, त्यामुळे ईडीचे प्रयोग करण्याची गरज नाही. ईडीच्या कारवाईमुळे जनतेमध्ये फार चीड निर्माण झाली आहे. लोक ईडीच्या अशा प्रकारच्या कारवाईला कंटाळलेले आहेत, अशा शब्दात अप्रत्यक्षपणे भाजपवर निशाणा साधत शिंदेसेनेचे खासदार गजानन कीर्तिकर यांनी आपला मुलगा आणि उद्धवसेनेतर्फे लढणाऱ्या अमोल कीर्तिकरची पाठराखण केली.

कीर्तिकर यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन ईडीच्या कारवाईबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत. अमोल किंवा सूरज चव्हाण यांच्यावर खिचडीसंदर्भात आरोप आहेत. या प्रकरणाची ईडीकडून चौकशी केली जात आहे. त्यासाठी दोघांनाही वारंवार बोलाविले जात आहे. 

तणावात ठेवण्यासाठी वारंवार चौकशी केली जातेnसूरज चव्हाण आणि अमोल यांनी खिचडी पुरवठादार म्हणून यात काम केले. या कंपनीत ते भागीदार नाहीत, यात नफा झाला, त्यातून सूरज चव्हाण आणि अमोल याला बँकेच्या खात्यात मानधन मिळाले, त्याचा करही भरला, यात मनी लॉन्ड्रिंग नाही, फसगत नाही. याला घोटाळा म्हटले जाते ते एकदम चुकीचे आहे.nईडी अधिकाऱ्यांनी परवा अमोलला चौकशीसाठी बोलविले, मागच्या वेळी जे विचारले तेच प्रश्न विचारले, तीच कागदपत्रे तपासली, तपास संपलेला आहे, पण तणावात ठेवण्यासाठी वारंवार चौकशीला बोलवले जाते, असेही कीर्तिकर म्हणाले.

बोलविता धनी कोण ?जागा वाटपात सन्मानजनक वागणूक मिळत नाही, जाहीर केलेला उमेदवारही भाजपने बदलायला लावल्याने शिंदेसेनेमध्ये खदखद आहे. त्यामुळे कीर्तीकरांच्या आडून शिंदेसेनेतील नेते बाण चालवत असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

गजानन कीर्तिकर यांचे शरीर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर आहे आणि आत्मा उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहे. एकदा त्यांनी ठरवावे की कुणाबरोबर आहे. मोदींचा चेहरा वापरून भाजप कार्यकर्त्यांच्या जीवावर ते दोनदा खासदार झाले. -अमित साटम, भाजप आमदार

कीर्तिकर म्हणाले...दर्प नको, सन्मान हवानरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान व्हावे ही मनापासून इच्छा आहे. पण आज ४०० पारचा नारा लावला जात आहे, त्यातून दर्प येता कामा नये. राज्यातील भाजप कार्यकर्ते तशा पद्धतीने वागतायत ते चुकीचे आहे. शिंदेसेनेची फार मोठी व्होटबँक राज्यात आहे. आम्ही युतीसोबत असल्याने त्या व्होट बँकेचा फायदा राज्यातील लोकसभा आणि नंतर विधानसभेत युतीच्या उमेदवारांना जिंकण्यासाठी होणार आहे. त्यामुळे आम्हाला चांगली वागणूक आणि सन्मान मिळाला पाहिजे, असेही कीर्तिकर म्हणाले.

टॅग्स :गजानन कीर्तीकरमुंबईनिवडणूकलोकसभा निवडणूक २०२४