शुल्क गोळा करण्यास बंदी
By Admin | Updated: November 8, 2014 01:17 IST2014-11-08T01:17:32+5:302014-11-08T01:17:32+5:30
नादुरुस्त वजन, माप व काटे दुरुस्त केल्यानंतर ते पुन्हा वापरात आणण्याआधी व्यावसायिकाने शासनाच्या वैध मापन शास्त्र यंत्रणेकडे पडताळणी शुल्क भरण्याचा नियम आहे

शुल्क गोळा करण्यास बंदी
चेतन ननावरे, मुंबई
नादुरुस्त वजन, माप व काटे दुरुस्त केल्यानंतर ते पुन्हा वापरात आणण्याआधी व्यावसायिकाने शासनाच्या वैध मापन शास्त्र यंत्रणेकडे पडताळणी शुल्क भरण्याचा नियम आहे. पूर्वीपासून यंत्र दुरुस्त करून त्याचे पडताळणी शुल्क भरण्याचे अतिरिक्त काम परवानाधारक दुरुस्तक करत होते. मात्र यापुढे दुरुस्तकांनी केवळ यंत्र दुरुस्त करावे, पडताळणी शुल्क गोळा करू नये, असा आदेश विभागाच्या नियंत्रकांनी दिला आहे. शासनाचे हे फर्मान घटनाबाह्य असून, ते तत्काळ मागे घेण्याची मागणी दुरुस्तकांनी केली आहे.
याआधी वैध मापन शास्त्र यंत्रणेने प्रत्येक भागात वजन, माप आणि काटे दुरुस्त करण्यासाठी दुरुस्तक म्हणून परवाने दिले आहेत. कोणत्याही दुकानातील वजन, माप किंवा काटा नादुरुस्त झाल्यास तो दुरुस्त करण्याचे काम केवळ परवानाधारक दुरुस्तकच करू शकतात. मात्र त्यासाठी शासनाची एक प्रक्रिया आहे. त्यात सर्वप्रथम नादुरुस्त यंत्र दुरुस्त करण्याआधी त्यावरील सील उघडण्यासाठी निरीक्षक कार्यालयात न्यावे लागते. सील उघडलेले नादुरुस्त यंत्र दुरुस्तक त्यांच्या कार्यशाळेत दुरुस्त करतात. दुरुस्त झालेले यंत्र पडताळणी करून सील करण्यासाठी पुन्हा निरीक्षक कार्यालयात आणावे लागते. पडताळणी करण्यासाठी शासन प्रत्येक यंत्रामागे ठरावीक शुल्कही आकारते. त्यानंतर पुन्हा सील केलेले निर्दोष वजन, माप किंवा काटा दुकानदार किंवा उपभोक्ता बाजारात वापरतो. गेल्या कैक वर्षांपासून बहुतेक निरीक्षक कार्यालयांत ही प्रक्रिया पूर्ण करण्याचे काम दुरुस्तक करीत आहेत.
परिणामी, नवनियुक्त नियंत्रक परंपरेपासून चालत आलेले काम बेकायदेशीर ठरवून मनमानी करीत असल्याचा आरोप काही दुरुस्तकांनी केला आहे. प्रशासनाने प्रत्येक दुरुस्तकाला केलेल्या कामाची नोंद ठेवण्यासाठी एक रजिस्टर दिले आहे. ते वेळोवेळी अपडेट ठेवणे सक्तीचे आहे. त्यात प्रत्येक वजन, माप आणि काट्याचे पडताळणी शुल्क भरण्याचा पर्यायही आहे. जर दुरुस्तक निरीक्षक कार्यालयात पडताळणी शुल्क भरण्यास गेला नाही, तर तो पर्याय भरणार कसा, असा सवालही काही दुरुस्तकांनी व्यक्त केला आहे.
याबाबत वैध मापन शास्त्र विभागाचे नियंत्रक संजय पाण्डेय म्हणाले, ‘प्रशासनाने दुरुस्तकांना नादुरुस्त वजन, माप व काटे दुरुस्त करण्यासाठी परवाने दिले आहेत. त्यांचा वापर पडताळणी शुल्क गोळा करण्यासाठी करता येणार नाही. दुरुस्तकाचे काम केवळ पडताळणीच्या कामामध्ये या विभागाला साहाय्य करण्याचे आहे. व्यवसायिकांकडून शासकीय रक्कम जमा करून चलनाद्वारे निरीक्षकाला देणे हे दुरुस्तकाचे काम नाही. शिवाय प्रत्येक वजन, माप आणि काट्यासाठी किती पडताळणी शुल्क लागते, याची माहिती जनहितार्थ खुली आहे. त्यासाठी दुरुस्तकाने स्वत: चलन भरण्यासाठी निरीक्षक कार्यालयात येण्याची गरज नाही.’
जसे माप तसे शुल्क
प्रत्येक दुकानात वेगवेगळ्या प्रकारचे वजनकाटे असतात. त्या-त्या वजनकाट्यातील बिघाडाप्रमाणे दुरुस्तक दर आकारतात. वजनाच्या अचूकतेप्रमाणे त्याचा वर्ग ठरतो; आणि त्याप्रमाणे व्यवसायिकाकडून दुरुस्ती आणि पडताळणी शुल्क आकारले जाते.