लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कोरोनाला प्रतिबंध करणाऱ्या लसींचा साठा संपुष्टात आल्यामुळे गुरुवारी पालिका आणि सरकारी केंद्रांत लसीकरण मोहीम बंद ठेवण्यात आली होती. मात्र, खासगी रुग्णालयांत ३२ हजार ७४ नागरिकांनी लस घेतली. तसेच सव्वा लाख लसींचा साठा केंद्रातून येणार असल्याने शुक्रवारी पालिका आणि सरकारी लसीकरण केंद्रावर पुन्हा लस मिळू शकेल.
मुंबईत १६ जानेवारीपासून लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली आहे. त्यानुसार आतापर्यंत ५४ लाख ६७ हजार ८०५ नागरिकांना लस देण्यात आली आहे. कोरोनाची संभाव्य तिसरी लाट येण्याआधी जास्तीतजास्त नागरिकांना लस देण्याचे पालिकेचे प्रयत्न सुरू आहेत. त्यानुसार दररोज एक लाख नागरिकांना लस देण्याचे लक्ष्य पालिकेने ठेवले आहे. गेले काही दिवस दररोज सरासरी एक लाख नागरिकांना लस देण्यात येत होती. सोमवारी तब्बल एक लाख ८० हजार नागरिकांना लस देण्यात आली. मात्र, केंद्रातून येणारा लसींचा साठा संपुष्टात आल्यामुळे गुरुवारी पालिका व सरकारी केंद्रांत कोणालाही लस देण्यात आली नाही. गुरुवारी मध्यरात्रीपर्यंत केंद्रातून सव्वा लाख लस येणार आहेत. त्यामुळे पालिका व सरकारी केंद्रांवरही शुक्रवारी लस मिळेल, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.