पाण्यासाठी मोजा पाण्यासारखा पैसा
By Admin | Updated: February 5, 2015 01:05 IST2015-02-05T01:05:12+5:302015-02-05T01:05:12+5:30
जल व मलनिस्सारण प्रकल्पांचा खर्च करोडोंच्या घरात असल्यामुळे दरवर्षी या आकारांमध्ये कर वाढविण्याची तरतूद चार वर्षांपूर्वीच अर्थसंकल्पात करून ठेवली आहे़

पाण्यासाठी मोजा पाण्यासारखा पैसा
प्रति किलो लिटर ३५ पैसे : मलनिस्सारण कर ८० टक्के
मुंबई : जल व मलनिस्सारण प्रकल्पांचा खर्च करोडोंच्या घरात असल्यामुळे दरवर्षी या आकारांमध्ये कर वाढविण्याची तरतूद चार वर्षांपूर्वीच अर्थसंकल्पात करून ठेवली आहे़ त्यामुळेच जकात कर रद्द झाल्यानंतरही या प्रकल्पांवर त्याचा परिणाम होणार नाही, अशी कबुली प्रशासनाने आज दिली़ त्याचबरोबर पाणीपट्टीमध्ये प्रति किलो लीटर ३५ पैसे तर मलनिस्सारण कर जल आकाराच्या ८० टक्के वसूल करण्याचा प्रस्ताव अर्थसंकल्पातून ठेवण्यात आला आहे़
मुंबईची वाढती तहान भागविण्यासाठी गारगाई, पिंजाळ व दमणगंगा-पिंजाळ हे स्रोत विकसित करण्यात येणार आहेत़ या प्रकल्पांसाठी अनुक्रमे १,८२० कोटी, १४,३९० कोटी व २७४७ कोटी खर्च अपेक्षित आहे़
त्याचबरोबर मुंबई मलनिस्सारण प्रकल्प टप्पा २ यासाठी १० हजार ६०० कोटी खर्च येणार आहे़ हा
खर्च भागविण्यासाठी वित्तीय संस्थांकडून कर्ज उभारणे व सेवांच्या दरामध्ये वाढ करण्याची गरज असल्याचे आयुक्तांनी अर्थसंकल्पातून नमूद केले आहे़
त्यानुसार पाण्याचे दर प्रति किलो लीटर ३५ पैसे आकारण्याचे प्रस्तावित आहे़ जल आकाराच्या ६० टक्के आकारण्यात येणारा मलनिस्सारण करही ८० टक्क्यांपर्यंत वसूल करण्याचा प्रस्ताव प्रशासनाने अर्थसंकल्पातून ठेवला आहे़ गेल्या वर्षभरात जमा झालेल्या या
उत्पन्नातून गारगाई-पिंजाळ प्रकल्पासाठी १४० कोटी, जलबोगद्यांसाठी ५१३ कोटी, जलवितरण व्यवस्था बळकट करण्यासाठी १५८ कोटींची तरतूद करण्यात आली आहे़ (प्रतिनिधी)
वीज निर्मितीसाठी प्रयत्न
भांडुप संकुल येथे १४ मेगावॅट क्षमतेच्या सौरऊर्जा निर्मिती केंद्रासाठी २० कोटी तरतूद आहे़ यातून १८ ते २० वर्षे वीज मिळू शकेल़ तसेच मध्य वैतरणा धरणातून २५ मेगावॅट क्षमतेच्या जलविद्युत निर्मिती केंद्रासाठी ३१ कोटींची तरतूद करण्यात आली आहे़
मलनिस्सारण बोगदा बांधकामांसाठी ११५ कोटी, जुन्या मलनिस्सारण केंद्रांची दर्जोन्नती २७़७० कोटी, कुलाबा, घाटकोपर, भांडुप, वर्सोवा आणि लव्हग्रोव्ह सांडपाणी प्रक्रियेसाठी ३२ कोटी, वाहिन्यांच्या स्वच्छतेसाठी ३० कोटी, झोपडपट्टी वसाहतीत मलनिस्सारण जाळे उभारण्याकरिता पथदर्शी प्रकल्पासाठी एक कोटी तरतूद करण्यात आली आहे़