शेअर बाजार २७ हजार अंकांच्या पार
By Admin | Updated: June 8, 2016 04:06 IST2016-06-08T04:06:03+5:302016-06-08T04:06:03+5:30
रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण आढाव्याचे शेअर बाजारात जोरदार स्वागत झाले.

शेअर बाजार २७ हजार अंकांच्या पार
मुंबई : रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण आढाव्याचे शेअर बाजारात जोरदार स्वागत झाले. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स २७ हजार अंकांचा टप्पा पार करून सात महिन्यांच्या उच्चांकावर गेला. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीनेही जोरदार वाढ नोंदविली.
सेन्सेक्स सकाळपासूनच तेजीत होता. हे वातावरण दिवसभर कायम राहिले. सत्राच्या अखेरीस २३२.२२ अंकांची अथवा 0.८७ टक्क्यांची वाढ नोंदवून सेन्सेक्स २७,00९.६७ अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ६५.४0 अंकांची अथवा 0.८0 टक्क्यांची वाढ नोंदवून ८,२६६.४५ अंकांवर बंद झाला.
स्टेट बँक आॅफ इंडियाचा समभाग ५.४ टक्क्यांनी वाढला. त्यापाठोपाठ आयसीआयसीआय बँकेचा समभाग ४.३१ टक्क्यांनी वाढला. तेजीचा लाभ मिळालेल्या बड्या कंपन्यांत आयटीसी, सन फार्मा, हिंद युनिलिव्हर, टाटा स्टील, एलअँडटी, लुपीन, भेल, ओएनजीसी आणि अदाणी पोर्ट्स यांचा समावेश आहे. या उटल इन्फोसिस, आरआयएल, एचडीएफसी, गेल आणि डॉ. रेड्डीज या कंपन्यांचे समभाग घसरले. डॉलर घसरल्याचा फटका आयटी कंपन्यांना बसल्याचे सांगण्यात आले. सेन्सेक्समध्ये समाविष्ट असलेल्या ३0 पैकी २५ कंपन्यांचे समभाग घसरले. व्यापक बाजारातही तेजीचाच कल पहायला मिळाला. बीएसई स्मॉलकॅप 0.९६ टक्क्यांनी, तर मीडकॅप 0.२९ टक्क्यांनी वाढला.
> २५ पैशांनी रुपया मजबूत
बँकिंग आणि जमीन जुमला क्षेत्रातील कंपन्यांचे समभाग मोठ्या प्रमाणात वाढले. डॉलरच्या तुलनेत रुपया २५ पैशांनी मजबूत झाला आहे. त्याचाही लाभ शेअर बाजाराला झाल्याचे जाणकारांनी सांगितले.