...तरीही रंगकर्मींचे पितृस्मृती आंदोलन होणारच !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:06 IST2021-09-27T04:06:41+5:302021-09-27T04:06:41+5:30
... राज चिंचणकर लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : ‘रंगकर्मी आंदोलन, महाराष्ट्र’ या मंचातर्फे सोमवार, २७ सप्टेंबर रोजी होणाऱ्या पितृस्मृती ...

...तरीही रंगकर्मींचे पितृस्मृती आंदोलन होणारच !
...
राज चिंचणकर
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : ‘रंगकर्मी आंदोलन, महाराष्ट्र’ या मंचातर्फे सोमवार, २७ सप्टेंबर रोजी होणाऱ्या पितृस्मृती आंदोलनावर रंगकर्मी ठाम आहेत. २२ ऑक्टोबर रोजी नाट्यगृहे व चित्रपटगृहे सुरू होणार असली, तरी नियोजित दिवशी श्राद्ध व पिंडदान करत हे आंदोलन होणारच, अशी भूमिका रंगकर्मींच्या मंचाने घेतली आहे.
वास्तविक, २२ ऑक्टोबरपासून नाट्यगृहे व चित्रपटगृहे सुरू होणार आहेत. या निर्णयाचा रंगकर्मींच्या या नियोजित आंदोलनावर परिणाम होईल, अशी चर्चा नाट्यसृष्टीत होती. मात्र ‘रंगकर्मी आंदोलन, महाराष्ट्र’ या मंचातर्फे नियोजित दिवशी हे आंदोलन होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यानुसार २७ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता शिवाजी पार्क येथे हे आंदोलन करण्यावर रंगकर्मी ठाम आहेत.
केवळ नाट्यगृहे व चित्रपटगृहे सुरू व्हावीत यासाठीच हे आंदोलन करण्यात येत नव्हते; तर सांस्कृतिक व लोककलेच्या क्षेत्रातील, हातावर पोट असणाऱ्या सर्व रंगकर्मींच्या वतीने हे आंदोलन हाती घेण्यात आले आहे, अशी भूमिका ‘रंगकर्मी आंदोलन, महाराष्ट्र’ या मंचाच्या वतीने मांडण्यात आली आहे. संपूर्ण सांस्कृतिक क्षेत्रच लवकरात लवकर कार्यरत व्हावे, अशी मागणी या मंचाने लावून धरली आहे.
चौकट:-
अजून निर्णय बाकी आहे...
- विजय पाटकर (प्रमुख कार्यकर्ते व ज्येष्ठ अभिनेते, रंगकर्मी आंदोलन, महाराष्ट्र).
नियोजित दिवशी, म्हणजेच २७ सप्टेंबर रोजी आम्ही पितृस्मृती आंदोलन करणार आहोत. नाट्यगृहे व चित्रपटगृहे २२ ऑक्टोबरला सुरू होत आहेत, ही आनंदाची गोष्ट आहे. परंतु त्याचबरोबर आमचे आंदोलन लोककलावंत; तसेच सांस्कृतिक क्षेत्रातील कलाकार यांच्यासाठीही आहे. त्यांच्याबद्दल अजून काही निर्णय झालेला नाही. त्यामुळे आम्ही आमचे नियोजित आंदोलन करणार आहोत.
----------------------