संतप्त शेतक-यांचा ठिय्या
By Admin | Updated: April 1, 2015 22:36 IST2015-04-01T22:36:40+5:302015-04-01T22:36:40+5:30
बिल्डरांच्या जमिनी आरक्षणातून वगळून शेतकऱ्यांच्या जमीनीवर आरक्षणे असल्याने शेती करण्यासाठी शेतकऱ्यांकडे जमिनीच शिल्लक राहणार

संतप्त शेतक-यांचा ठिय्या
पालघर : बिल्डरांच्या जमिनी आरक्षणातून वगळून शेतकऱ्यांच्या जमीनीवर आरक्षणे असल्याने शेती करण्यासाठी शेतकऱ्यांकडे जमिनीच शिल्लक राहणार नसल्याने उद्विग्न झालेल्या शेकडो शेतकऱ्यांनी शेतीची अवजारे नगररचना विभागासमोर आणून आपला रोष व्यक्त केला. यावेळी संघर्ष समितीने पालघर-माहिम रस्त्यावर ठिय्या आंदोलन करीत वाहतूक ठप्प केली.
पालघर नगरपरिषदेचा प्रारूप विकास आराखडा हा शेतकरी, ग्रामस्थांवर अन्याय करणारा असून हा आराखडा रद्द करावा या मागणीसाठी टेंभोडे, अल्याळी, नवली, वेवूर, घोलविरा, गोठणपूर व परिसरातील शेतकरी व ग्रामस्थांनी अनेकदा मोर्चे, आंदोलने केली आहेत. परंतु, राज्यशासनाच्या नगरविकास विभागाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याने प्रारूप विकास आराखडा विरोधी संघर्ष समितीने २३ फेब्रुवारीपासून पालघर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषणाला सुरूवात केली होती. परंतु या उपोषणाला आठ दिवस उलटूनही याची दखल नगररचना विभाग वा जिल्हाधिकारी कार्यालयाने न घेतल्याने समितीच्या वतीने आता शेतकरी, ग्रामस्थांनी पालघर स्टेशन वरून मोर्चाद्वारे नगररचना विभागाकडे कूच केली. यावेळी माजी राज्यमंत्री राजेंद्र गावित, नगराध्यक्षा प्रियांका पाटील, जिल्हाप्रमुख उत्तम पिंपळे, सुभाष पाटील, संगिता धोडे, डॉ. उज्वला काळे, केदार काळे, मनवेल तुस्कानो, मनसेचे अरूण कदम, काँग्रेसचे सिकंदर शेख, कैलास म्हात्रे, लक्ष्मी देवी हजारी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
आठ दिवसाच्या साखळी उपोषणानंतरही दखल घेतली जात नसल्याने संतप्त नागरीकांनी नगररचनाकार हायहाय, भोपळे, दिशा सावंत, देव या भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई करा, बिल्डरांच्या परवानग्या रद्द करा अशा घोषणा देत सुमारे दोन तास नगररचना विभागासमोरील रस्त्यावर ठिय्या आंदोलन करीत वाहतूक बंद पाडली.
या दरम्यान महाराष्ट्र विधानसभा विरोधी पक्षनेता राधाकृष्ण विखे पाटील यांनी हा प्रश्न लक्षवेधीद्वारे उपस्थित करण्यासाठी सूचना विधीमंडळ प्रधान सचिवाकडे पाठविल्याचे सांगून मुख्यमंत्र्याने प्रारुप विकास आराखडा रद्द करावा अशी मागणी माजी राज्यमंत्री गावितांनी केली आहे. यावेळी दंगल नियंत्रण पथकासह मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. (वार्ताहर)