Join us  

हृदयविकारामुळे होणारे मृत्यू रोखण्यासाठी राज्यात ‘स्टेमी’ प्रकल्प

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2020 5:38 AM

हृदयाला रक्त पुरवठा कमी झाल्याच्या कारणांमुळे होणाऱ्या आजाराने मृत्युचे प्रमाण राज्यात जास्त आहे. ते लक्षात घेऊन ‘स्टेमी’ प्रकल्प लवकर सुरू करण्यात येईल.

मुंबई : हृदयाला रक्त पुरवठा कमी झाल्याच्या कारणांमुळे होणाऱ्या आजाराने मृत्युचे प्रमाण राज्यात जास्त आहे. ते लक्षात घेऊन ‘स्टेमी’ प्रकल्प लवकर सुरू करण्यात येईल. या प्रकल्पाच्या माध्यमातून हृदयविकाराचा झटका आलेल्या रुग्णांना गोल्डन अवरमध्ये उपचार देऊन त्यांना जीवदान देण्यात येईल. पहिल्या टप्प्यात दहा जिल्ह्यांमध्ये हा प्रकल्प सुरु करण्यात येणार असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जाहीर केले.कोरोनरी आर्टरी आजारामुळे ग्रामीण भागातील तीन ते चार टक्के आणि शहरी भागात आठ ते दहा टक्के व्यक्तींना हृदयरोग होतो. त्यामुळे मृत्युचे प्रमाण जास्त असल्याचे निदर्शनास आले आहे. ही परिस्थिती रोखण्यासाठी हृदयविकाराचा झटका आल्यानंतर सुवर्ण तासात औषधोपचार करुन मृत्युचे प्रमाण कमी करण्याचे उद्दिष्ट ‘स्टेमी’ प्रकल्पातून केले जाणार आहे.‘स्टेमी’ प्रकल्प पुणे, नागपूर, औरंगाबाद, नांदेड, अकोला, नाशिक, ठाणे, रत्नागिरी, सोलापूर आणि वर्धा या १० जिल्ह्यांमध्ये पहिल्या टप्प्यात राबविण्यात येणार असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. या प्रकल्पामध्ये ‘स्पोक’व ‘हब’ हे मॉडेल वापरण्यात येणार आहे. ‘स्पोक’मध्ये उपजिल्हा व जिल्हा रुग्णालय यांचा समावेश असून त्या ठिकाणी अतिदक्षता विभाग आणि हृदयविकारासंबंधी अतितत्काळ सेवा दिल्या जातात. अशा रुग्णालयांचा समावेश आहे. राज्यात ११० ठिकाणी ‘स्पोक’ स्थापन करण्यात येणार असून त्याठिकाणी ‘ईसीजी’ यंत्र लावण्यात येईल.याठिकाणी रुग्ण आल्यावर त्याचा ‘ईसीजी’ काढला जाईल आणि तो माहिती तंत्रज्ञानाच्या मदतीने ‘क्लाऊड कनेक्टिव्हीटी’च्या माध्यमातून तज्ज्ञांकडे पाठविला जाईल. औषधोपचाराबाबत दहा मिनिटांत मार्गदर्शन केले जाईल. ‘स्पोक’मध्ये रुग्णांचा ईसीजी करुन हृदयविकाराचा झटका आला की नाही याची तपासणी केली जाते. झटका आलेल्या रुग्णाला तत्काळ रक्ताची गुठळी पातळ करण्याचे औषध (थ्राँबोलिसिस) दिले जाईल. त्यानंतर त्या रुग्णाला हब येथे पुढच्या उपचारासाठी पाठविले जाईल.

टॅग्स :हृदयरोगआरोग्य