Join us
Daily Top 2Weekly Top 5

वाहनांचे स्टेअरिंग महिलांच्या हाती, 41 हजार जणींना परवाना

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2023 09:49 IST

पुरुषांप्रमाणेच दुचाकी, चारचाकी चालविण्याकडेही महिलांचा भर

मुंबई : महिला आता पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक क्षेत्रात पुढे पाऊल टाकत आहेत. पुरुषांप्रमाणेच दुचाकी, चारचाकी चालविण्याकडेही महिलांनी भर दिला आहे. आरटीओमधून महिलांनी घेतलेल्या चालक परवान्यावरून हे स्पष्टपणे दिसून येत आहे. गेल्या नऊ महिन्यांत अंधेरी आणि बोरिवली आरटीओत ४१ हजार महिलांना वाहन परवाना मिळाला आहे.

घर आणि नोकरी सांभाळण्याबरोबरच महिलांच्या हाती वाहनांचे  स्टिअरिंगही आल्याचे स्पष्ट दिसते आहे. रस्ता शहरातील असो वा ग्रामीण भागातील; कोणत्याही रस्त्यावर दुचाकी चालविणाऱ्या युवती आणि महिला हमखास दिसतात. त्यात आता चारचाकी वाहनचालक महिलांची संख्याही वाढू लागली आहे. काही वर्षांपूर्वी पुरुषांची मक्तेदारी असलेल्या ड्रायव्हिंग क्षेत्रातही महिलांची संख्या झपाट्याने वाढत आहे.

आरटीओ कार्यालयातील सर्व व्यवहार ऑनलाईन झाले आहेत. त्यामुळेच महिलांनाही प्राधान्य मिळाले आहे. ज्या महिलांनी वाहन परवाना काढला आहे, त्यांतील अधिकतर महिलांनी परवान्यासाठी ऑनलाइन अर्ज केले आहेत. कच्चा वाहन परवाना दिल्यानंतरच त्यांनी पक्क्या वाहन परवान्यासाठी अर्ज केला होता. ऑनलाइनमुळेच महिलांना प्राधान्य मिळाले आहे.

दोन लाख जणांनी घेतला वाहन परवाना

नऊ महिन्यांत  महिला आणि पुरुषांनी मिळून दोन लाखांहून अधिक जणांनी वाहन परवाना घेतला आहे. काहीजणांनी ऑनलाइन अर्ज केले असून, त्यांची प्रक्रिया सुरू आहे. अंधेरी आणि बोरिवलीमध्ये  महिलांनी वाहन परवाना घेतला आहे.