Join us

एटीएम कार्ड चोरत घातला गंडा, मालाड पोलिसात गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2023 15:51 IST

एका ग्राहकाने अधिकचे पैसे दिल्याचे त्यांना फोन करून सांगितल्याने त्यांना शहानिशा करायची होती.

गौरी टेंबकर 

मुंबई: गोरेगाव पश्चिमच्या रुस्तमजी ओझोन या ठिकाणी असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडिया एटीएममध्ये २३ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता मोहिजुद्दिन खान (४९) हे रिक्षा चालक बँक स्टेटमेंट काढायला गेले होते. एका ग्राहकाने अधिकचे पैसे दिल्याचे त्यांना फोन करून सांगितल्याने त्यांना शहानिशा करायची होती.  जेणेकरून ते पैसे ग्राहकाला परत पाठवता येतील. मात्र शनिवारी बँकेला सुट्टी असल्याने एटीएममधून त्यांनी ते स्टेटमेंट काढायचा प्रयत्न केला.

मात्र काही तांत्रिक एरर येऊन तो व्यवहार झालाच नाही. त्यावेळी त्यांच्या परिचितला त्यांनी मदतीसाठी बोलावले. मात्र त्याच्या मागोमाग एक अनोळखी व्यक्ती त्यांच्या मदतीला आला. त्याने खान यांना बोलण्यात गुंतवले आणि त्यांच्याकडून त्यांचे एटीएम कार्ड घेतले. खान यांनी त्याच्याकडून त्यांचे कार्ड परत घेतले आणि ते निघून गेले.

मात्र भामट्याने हातचलाखीने खान यांचे एटीएम कार्ड लंपास केले. तसेच व्यवहार करताना त्यांचा पिन नंबरही त्याने पाहिला होता. ज्याचा फायदा घेत एकूण २० हजार रुपये खान यांच्या खात्यातून त्याने काढले. या फसवणूकप्रकरणी मालाड पोलिसात खान यांनी तक्रार दिल्यावर तपास सुरू करण्यात आला आहे.