धर्मांच्या नावाखाली राज्यांत भेदभाव नको
By Admin | Updated: February 4, 2015 02:47 IST2015-02-04T02:47:51+5:302015-02-04T02:47:51+5:30
आपण धर्मनिरपेक्ष या शब्दाचा अर्थ कसा घेतो, यावर सर्वकाही अवलंबून आहे. धर्मनिरपेक्षतेबाबतीत राज्यांचा विचार केल्यास राज्याला कोणताही स्वत:चा धर्म नाही.

धर्मांच्या नावाखाली राज्यांत भेदभाव नको
मुंबई : आपण धर्मनिरपेक्ष या शब्दाचा अर्थ कसा घेतो, यावर सर्वकाही अवलंबून आहे. धर्मनिरपेक्षतेबाबतीत राज्यांचा विचार केल्यास राज्याला कोणताही स्वत:चा धर्म नाही. त्यामुळे धर्मांच्या नावाखाली राज्यांमध्ये असा भेदभाव करणेही योग्य नसून धर्म, जात किंवा पंथ यावरून राज्याचे मूल्यमापन केले जाऊ शकत नाही, असे प्रतिपादन उपराष्ट्रपती मोहंमद हमीद अन्सारी यांनी केले.
आपल्या दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यादरम्यान उपराष्ट्रपती मोहंमद हमीद अन्सारी यांनी मंगळवारी विल्सन महाविद्यालयातील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. या वेळी विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील विविध मुद्द्यांवर त्यांना प्रश्न विचारले. या वेळी राज्याचे राज्यपाल सी. विद्यासागर राव, उद्योगमंत्री सुभाष देसाई आदी मान्यवर उपस्थित होते. या वेळी बोलताना उपराष्ट्रपती म्हणाले की, राज्यघटनेच्या भावनेशी निष्ठावान आणि प्रामाणिक राहणे हे आपल्या प्रत्येकाचे एक नागरिक म्हणून कर्तव्य आहे. राज्यघटनेची भावना चार शब्दांत सांगण्यात आली आहे. लोकांमध्ये जात, धर्म, वर्ण यावरून भेद न करता त्यांना समान कायद्याने तोलले पाहिजे, असेही ते या वेळी म्हणाले.
स्त्री किंवा पुरुष म्हणून भेदभाव करणे कायद्याला मान्यच नाही. आपला समाज अनेक वाईट प्रथा, चालीरितींना बळी पडलेला आहे. त्यांचा खूप त्रास समाजाला होतो. यापैकी एक त्रास म्हणजे महिलांच्या बाबतीत केला जाणारा भेदभाव. हे एक सामाजिक आव्हान आहे. त्यामुळे त्याला उत्तर सामाजिक बदलातूनच द्याावे लागेल, असेही त्यांनी या वेळी नमूद केले. याप्रसंगी उपराष्ट्रपतींच्या हस्ते पाच डीव्हीडींच्या संचाचे उद्घाटन करण्यात आले. (प्रतिनिधी)