Join us

नारायण राणेंसह चंद्रकांत पाटील यांच्यावर कारवाई करा; राज्य महिला आयोगाचे पोलिसांना निर्देश

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2022 06:34 IST

२४ तासांत याबाबतच्या कार्यवाहीचा अहवाल आयोगाला सादर करण्याची सूचना पोलिसांना करण्यात आली आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : दिशा सॅलियन मृत्यूप्रकरणी खोटी विधाने करत संभ्रम निर्माण केल्याबद्दल केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर तसेच त्यांचा विधानांना माध्यमांतून दुजोरा दिल्याबद्दल भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि आमदार नितेश राणे यांच्यावर तात्काळ फौजदारी कारवाई करण्याचे आदेश राज्य महिला आयोगाने मालवणी पोलिसांना दिले आहेत. तसेच, २४ तासांत याबाबतच्या कार्यवाहीचा अहवाल आयोगाला सादर करण्याची सूचना पोलिसांना करण्यात आली आहे. 

महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी दिशा सॅलियन मृत्यू प्रकरणी अहवाल सादर करण्यास सांगितले होते. त्यानुसार पोलिसांनी आयोगाला दिलेल्या अहवालात दिशावर बलात्कार झाला नव्हता किंवा ती गरोदर नव्हती असे स्पष्ट करण्यात आले आहे. मृत्यूनंतर दिशाची सुरू असलेली बदनामी थांबवावी. दिशाच्या मृत्यूबद्दल खोटी व बदनामीकारक माहिती दिल्याबद्दल केंद्रीय मंत्री नारायण राणे , आ. नितेश राणे व संबंधितांवर कारवाईची मागणी दिशाच्या आईवडिलांनी राज्य महिला आयोगाकडे केली आहे. तसेच, दिशाबद्दल समाज माध्यमावरील चुकीची व बदनामीकारक माहिती काढून टाकण्याचीही मागणी आई वसंती सॅलियन,  वडील सतीश सॅलियन यांनी आयोगाकडे केली आहे. या पार्श्वभूमीवर  नारायण राणे आणि नितेश राणे यांच्यासह चंद्रकांत पाटील यांच्यावर तात्काळ फौजदारी कारवाई करून केलेल्या कार्यवाहीचा अहवाल राज्य महिला आयोगास २४ तासांच्या आत सादर करण्याचे निर्देश  मालवणी पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना दिले आहेत.

सॅलियन दाम्पत्याला सुरक्षा द्या- आयोग

- तसेच दिशा सॅलियन मृत्यू प्रकरणी सोशल मीडियावरील लाखो खोटे अकाऊंट्स बंद करून तिच्याबद्दल नमूद असलेली खोटी माहिती तात्काळ काढून टाकावी. 

- ज्येष्ठ नागरिक असलेल्या सॅलियन दाम्पत्याला शांततेने व सुरक्षित जगता यावे याकरिता योग्य ती सुरक्षात्मक उपाययोजना करावी आणि  त्यांच्या मागणीनुसार या प्रकरणी योग्य ती चौकशी करून कारवाई करावी, असेही महिला आयोगाने आपल्या आदेशात म्हटले आहे.

टॅग्स :राजकारणनारायण राणेचंद्रकांत पाटील