Join us

"महिलांसाठी प्राधान्याने रेल्वे सेवा सुरु व्हावी, यासाठी राज्य सरकार आग्रही" 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2020 19:19 IST

Mumbai Local : रेल्वेसेवा सुरु करण्यासंदर्भात केंद्रीय रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांच्याशी बोलणार असल्याचे अस्लम शेख यांनी सांगितले.

ठळक मुद्दे'राज्य सरकारने याबद्दल केलेल्या विनंतीला रेल्वे प्रशासनाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे.'

मुंबई  : नवरात्रौत्सवात महिलांसाठी प्राधान्याने रेल्वे सेवा सुरु होण्यासाठी राज्य सरकार आग्रही आहे. महिलांसाठी प्राधान्याने रेल्वे सेवा सुरु व्हावी, यासाठी राज्य सरकारने पालिका आयुक्त, मुंबईचे पोलिस आयुक्त व रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी यांच्यासोबत गेल्या १३ ऑक्टोबरला बैठक घेऊन महिलांसाठी प्राधान्याने रेल्वे सेवा सुरु करण्याचा निर्णय घेतला.

नवरात्रीच्या पहिल्या दिवशी रेल्वे सेवा महिलांसाठी सुरु करण्याचा राज्य सरकारचा मानस होता. मात्र,  रेल्वे बोर्डाकडून नवीन मार्गदर्शक तत्त्वे, अटी व शर्ती लागू करण्यात आल्याने व रेल्वे सेवा सुरु करण्यास मान्यता न मिळाल्याने महिलांसाठी रेल्वे सेवा सुरु होण्यास विलंब लागत असल्याचे मत मुंबई शहराचे  पालकमंत्री व राज्याचे मत्स्यव्यवसाय, वस्त्रोद्योग व बंदर खात्याचे मंत्री अस्लम शेख यांनी व्यक्त केले आहे. याचबरोबर, नवरात्रौत्सवात महिलांसाठी प्राधान्याने रेल्वे सेवा सुरु व्हावी, यासाठी आपण स्वत: रेल्वेसेवा सुरु करण्यासंदर्भात केंद्रीय रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांच्याशी बोलणार असल्याचेही अस्लम शेख यांनी सांगितले.

दरम्यान, महिलांना लवकरच लोकलमधून प्रवास करण्याची परवानगी मिळू शकते. राज्य सरकारने याबद्दल केलेल्या विनंतीला रेल्वे प्रशासनाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे महिलांना लवकरच रेल्वे प्रवासाची मुभा मिळू शकते. राज्य सरकार आणि रेल्वे प्रशासन याबद्दल लवकरच निर्णय घेईल, अशी माहिती पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनिल ठाकूर यांनी दिली.  

टॅग्स :मुंबई लोकल