Join us
Daily Top 2Weekly Top 5

राज्य सरकारने दिला मत्स्य व्यवसायाला शेतीचा दर्जा; मच्छिमारांमध्ये पसरले आनंदाचे वातावरण

By मनोहर कुंभेजकर | Updated: April 22, 2025 19:30 IST

मत्स्य व्यवसायाला शेतीचा दर्जा देण्याचा ऐतिहासिक निर्णय

मनोहर कुंभेजकर

मुंबई-महाराष्ट्र शासनाने आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टीवरील सागरी व भूजलाशयीन मच्छीमार बांधवांच्या विकासाच्या दृष्टीने मत्स्य व्यवसायाला शेतीचा दर्जा देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला.त्यामुळे मच्छिमारांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.लोकमतने देखिल हा विषय मांडून शासनाचे लक्ष वेधले होते.

कोळी महासंघाचे अध्यक्ष व भाजपाचे विधान परिषदेचे माजी आमदार रमेश पाटील हे मागील काही वर्षापासून राज्यातील कोकण किनारपट्टीवरील सागरी व भूजलाशयीन मासेमारी व्यवसायाला शेतीचा दर्जा देण्याची शासनाकडे वारंवार मागणी करत होते. याकरीता त्यांनी अनेक वेळा अधिवेशनात प्रश्न उपस्थित करून सरकारचे या मागणीकडे लक्ष वेधले होते. वारंवार येणाऱ्या नैसर्गिक आपत्तीमुळे व मत्स्य दुष्काळामुळे राज्यातील मच्छिमार बांधवांचा व्यवसाय अडचणीत आला असल्याने मच्छीमार बांधवांचा आर्थिक विकास करण्याकरीता व शेतकऱ्यांप्रमाणे शासनाच्या विविध सुविधांचा लाभ मच्छीमारांना मिळण्याकरीता मत्स्य व्यवसायाला शेतीचा दर्जा देण्याची आग्रही मागणी रमेश पाटील यांच्या वतीने करण्यात येत होती. अखेर महाराष्ट्र सरकारने आज मत्स्य व्यवसायाला शेतीचा दर्जा देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेऊन महाराष्ट्रातील सर्व मच्छीमार बांधवांना मोठा दिलासा दिला आहे. हा निर्णय राज्यातील मच्छीमार बांधवांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असून त्याचा मासेमारी व्यवसायावर अनुकूल व सकारात्मक परिणाम निश्चितच होणार आहे.

 रमेश पाटील यांनी लोकमतला सांगितले की,मत्स्य व्यवसायाला शेतीचा दर्जा देण्याचा निर्णय हा राज्यातील मच्छीमार व्यवसायाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. या निर्णयामुळे मासेमारी क्षेत्राचा विकास होणार असून नवीन तंत्रज्ञानाच्या साह्याने मत्स्य शेती करण्यासाठी आर्थिक मदत मिळवण्यासाठी मच्छीमार बांधव पात्र होतील. त्याचप्रमाणे शेतीसाठी असणाऱ्या सुविधांचा लाभ घेणे मच्छीमारांना शक्य होणार आहे. शेतकऱ्यांप्रमाणे वीज दरात सवलत आणि शीतगृह सुविधेसाठी व बर्फ कारखान्यासाठी अनुदान मिळून मच्छीमार बांधवांचा सर्वांगीण विकास होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

 महाराष्ट्र शासनाने मत्स्य व्यवसायाला शेतीचा दर्जा दिल्याबद्दल  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांचे कोळी महासंघ व भारतीय जनता पार्टी मच्छीमार सेल त्याचप्रमाणे राज्यातील सर्व मच्छीमार बांधवांच्या वतीने त्यांनी आभार मानले .

टॅग्स :देवेंद्र फडणवीसनीतेश राणे