लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्यातील कर्करोगाच्या रुग्णांपैकी ७० टक्के रुग्णांना गुटखा खाल्ल्याने कर्करोग झाल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे गुटखा विक्री करणाऱ्यांवर मकोका अंतर्गत कारवाई करण्याची मागणी भाजपा आमदार श्रीकांत भारतीय यांनी केली. त्यावर अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी गुटखा व पान मसालाजन्य पदार्थांची वाहतूक व विक्री करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध मकोका अंतर्गत गुन्हा दाखल करता येईल का? याबाबत विधी व न्याय विभागाकडे प्रस्ताव पाठवून मार्गदर्शन घेतले जाईल, असे स्पष्ट केले.
प्रश्नोत्तराच्या तासात आ. भारतीय यांनी राज्यात गुटखा विक्रीस किंवा साठवणूक करण्यास बंदी असूनही अनेक दुकानदार गुटखा विक्री करत आहेत. अन्न व औषध प्रशासन विभाग माहीत असूनही त्यावर कारवाई करत नाहीत., असा आरोपही त्यांनी केला.
३ कोटींहून अधिक किमतीचा गुटखा जप्त मंत्री झिरवाळ यांनी १ एप्रिल ते ३१ मे २०२५ या काळात ५३ ठिकाणी छापे घालून १० वाहनांसह ३ कोटींहून अधिक किमतीचा गुटखा जप्त केल्याचे सांगितले. प्रशासन याबाबत जागरूक असून, दोन महिन्यांत राज्यात ४५८ ठिकाणी कारवाई केली आहे. तसेच गुटखा वाहतूक करताना जप्त केलेल्या वाहनांचा पुन्हा वापर होऊ नये, यासाठी ते जप्त करून सील करण्याचे निर्देश अन्न आणि औषध प्रशासन आयुक्तांना देण्यात आले आहेत, असे सांगितले.
दहिसर, मुलुंड, मालाडमध्ये अधिकारीदहिसर, मुलुंड, मालाड सारख्या परिसरात चौकशी अधिकाऱ्यांची नेमणूक करून संबंधित गुटखा विक्रीसंदर्भात तपासणी करून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असेही मंत्री झिरवाळ म्हणाले.