Join us  

राज्य उत्पादन शुल्क विभाग नाताळ, नववर्षादरम्यान कारवाईसाठी सज्ज  

By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2019 10:16 PM

अवैध मद्यसाठा व अवैध मद्यविक्री संदर्भात; राज्य उत्पादन शुल्क दक्ष

ठळक मुद्देगोवा दमण येथून मुंबईत येणारी ट्रॅव्हेल्स बसेस, रेल्वे तपासणी मोहिम होणार आहे.मुंबई शहर जिल्ह्यामध्ये या आर्थिक वर्षात दारुबंदी गुन्ह्याअंतर्गत 299 गुन्हे उघडकीस आणलेले

मुंबई -  राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या दृष्टीने संपूर्ण डिसेंबर महिना हा अतिशय संवेदनशील अशा प्रकारचा असतो. या कालावधीत नाताळ, नवीन वर्ष स्वागत या सारखे सण येतात. ते सर्व समाज बांधवांकडून मोठ्या प्रमाणावर अतिशय उत्साहाने साजरे केले जातात. या दरम्यान जनमाणसाचा मद्य प्राशनाकडे ओढा जास्त प्रमाणात आढळून येतो. त्यामुळे या काळात, अवैध मद्य विक्रीबाबत राज्य उत्पादन शुल्क विभाग अधिक दक्षतेने काम करणार असून विनापरवाना वा भेसळयुक्त. ड्यूटी फ्री, डिफेन्स मद्याचा वापर सार्वजनिक वा समारंभाकरीता करण्यात येऊ नये. असे आवाहन प्राजक्ता लवंगारे (भा. प्र. से.), आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, यांचेकडून करण्यात आले आहे.

महाराष्ट्र राज्यात, सीमेलगतच राज्यांच्या (गोवा, दमण, दादरा, नगर हवेली, सिल्वासा ) तुलनेत मद्याचे दर जास्त असल्याने या परराज्यातून उत्पादन शुल्क बुडीत मद्य, बनावट मद्य, ड्युटी फ्री मद्य, अवैध हातभट्टी निर्मिती/विक्री/ वाहतुक यांचा देखिल मोठ्या प्रमाणावर अवैध व्यापार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. नजिकच्या काळात बनावट स्कॉच/ मद्य निर्मिती/ विक्री यांचे उघडकीस आणलेले गुन्हे यामुळे सदर कालावधीत मोठ्या प्रमाणावर एक दिवसीय तात्पुरती क्लब अनुज्ञप्ती मधून सदर बनावट स्कॉचचा/ ड्युटी फ्री मद्याचा सर्रास वापर होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

दैनंदिन पार्टीचे ठिकाणी तपासणीनाताळ व नववर्षाकरीता मोठ्या प्रमाणात तात्पुरती क्लब अनुज्ञप्ती (One Day) अनुज्ञप्ती वितरीत करण्यात येतात. याठिकाणी भेसळयुक्त मद्य/ ड्युटी फ्री/ डिफेन्सचे मद्य प्राशन वा विक्री होऊ नये करीता 09 तपासणी पथके केलेली असून डिसेंबर अखेर दैनंदिन पार्टीचे ठिकाणी तपासणी होणार आहे. मुंबई शहरातील स्पोटर्स क्लब, पंचतारांकित हॉटेल्स, देशी - विदेशी वाईन शॉप आस्थापना यांना एक दिवसीय मद्यप्राशन परवाने वितरीत केलेले आहेत. गोवा दमण येथून मुंबईत येणारी ट्रॅव्हेल्स बसेस, रेल्वे तपासणी मोहिम होणार आहे.

मुंबई शहर जिल्ह्यातील कार्यवाहीमुंबई शहर जिल्ह्यामध्ये या आर्थिक वर्षात दारुबंदी गुन्ह्याअंतर्गत 299 गुन्हे उघडकीस आणलेले असून यामध्ये 306 आरोपींना अटक करून 11 वाहने जप्त केलेली आहेत. यामध्ये अवैध हातभट्टी, वाहतुक, बनावट स्कॉच, ड्युटी फ्री, उच्च प्रतीचे मद्य, दमण गोवा निर्मित मद्य, बिअर यांचा समावेश आहे. एकूण रु. 52,24,212/ - चा मुद्देमाल जप्त केलेला आहे. प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून महाराष्ट्र दारुबंदी कायदा, 1949 चे कलम 93 अंतर्गत एकूण 67 इसमांचे प्रस्ताव संबंधित पोलीस अधिकारी यांना सादर केलेले आहेत. जिल्ह्यामध्ये प्रभावी नियंत्रणाकरीता अधीक्षक  सी. बी. राजपूत व 02 उप - अधीक्षक यांचे मार्गदर्शनाखाली 02 भरारी पथके, 09 कार्यकारी निरीक्षक यांची पथके कार्यरत आहेत.अवैध हातभट्टी मद्य/ बनावट मद्य/ डयूटी फ्री मद्य/ डिफेन्स मद्य/ तसेच, विनापरवाना मद्य पार्टीचे बाबत काही माहित असल्यास राज्य उत्पादन शुल्क विभाग अथवा पोलीस विभागास तात्काळ अवगत करावे. उच्च प्रतीचे मद्य/ स्कॉच/ ड्यूटी फ्री अथवा बनावट भेसळ केलेल्या मद्याचा अवैधरित्या वापर/ प्राशन करणे यामुळे आपणांस कारवाईस सामोरे जावे लागेल, आपली आर्थिक फसवणूक व आरोग्याकरीता हे मद्य अपायकारक ठरू शकते. असेही आवाहन करण्यात येत आहे.

टॅग्स :उत्पादन शुल्क विभागमुंबईदारूबंदीनववर्षनाताळ